हाता परिसरात पूर्णा नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:17 AM2021-05-30T04:17:11+5:302021-05-30T04:17:11+5:30
हाता : बाळापूर तालुक्यातील हाता परिसरात पूर्णा नदीपात्रातून दिवसाढवळ्या रेतीचा अवैध उपसा सुरू असून, रेतीची अवैध वाहतूक सर्रास सुरू ...
हाता : बाळापूर तालुक्यातील हाता परिसरात पूर्णा नदीपात्रातून दिवसाढवळ्या रेतीचा अवैध उपसा सुरू असून, रेतीची अवैध वाहतूक सर्रास सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने लाखो रुपयांच्या महसूलला चुना लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बाळापूर तहसील अंतर्गत येत असलेल्या ग्राम हाता येथे गावाला लागून पूर्णा नदी वाहते. रेतीमाफीयांकडून नदीपात्रात खड्डे करून रेतीचा अवैध उपसा करण्यात येत असल्याचे चित्र आहे. गावातूनच ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैध वाहतूक केली जात असल्याने महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रात्रंदिवस रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. (फोटो)
--------------------------
रेतीमाफीयांकडून रात्रंदिवस उपसा!
जिल्ह्यात एकाही रेती घाटाचा लिलाव न झाल्याने रेतीमाफीयांकडून रेतीची अव्वाच्या सव्वा भावाने विक्री केली जात आहे. हाता परिसरात अवैध उपसा होत असूनही महसूल विभागाकडून गेल्या दोन ते तीन महिन्यांत एकही कारवाई केली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रेतीमाफीयांकडून पूर्णा नदीपात्रातून रात्रंदिवस रेतीचा अवैध उपसा सुरू असल्याचे चित्र आहे.
--------------------------
नदीपात्रात खड्डेच खड्डे, अपघाताची शक्यता!
हाता परिसरातील पूर्णा नदीच्या पात्रात अवैध उपसा सुरू असल्याने नदीपात्रात खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
----------------------
शेतीचे नुकसान होण्याची शक्यता!
पूर्णा नदीच्या पात्रातून अवैध उपसा सुरू असल्याने नदीकाठावरील शेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. नदीच्या काठावर मोठमोठे खड्डे पडल्याने पूर आल्यास शेती खचून जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे. शेतात नदीचे पाणी शिरून पिकाचे नुकसान होणार असल्याची प्रतिक्रिया शेतकरी गजानन नारायण बावणे यांनी दिली.