अवैध सावकारी : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:18 AM2017-10-10T02:18:30+5:302017-10-10T02:20:48+5:30
अकोट : शेतीच्या व्यवहारासंदर्भात अवैध सावकारी केल्याचे चौकशी अहवालावरून अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये बोर्डी येथील पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : शेतीच्या व्यवहारासंदर्भात अवैध सावकारी केल्याचे चौकशी अहवालावरून अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये बोर्डी येथील पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डी येथील चंद्रभान पांडुरंग ढोले व अन्नपूर्णा चंद्रभान ढोले यांच्याकडून ज्ञानदेव रामचंद्र पोटे यांनी २0 हजार रुपये घेऊन तारण म्हणून कासोद येथील शेतीची खरेदी करून दिली होती. त्यानंतर पोटे यांनी घेतलेली रक्कम परत केल्यावरही त्यांची जमीन परत त्यांच्या नावावर करून दिली नाही. या प्रकरणी पोटे यांनी सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे प्रकरण दाखल केले होते. या प्रकरणाची चौकशीअंती सदर शेतीचा व्यवहार हा अवैध सावकारीचा असल्याने सहकारी अधिकारी मोहन सुधीर गवई यांनी अकोट ग्रामीण पोलिसात चौकशी अहवालासह फिर्याद दाखल केली. त्यावरून आरोपी चंद्रभान ढोले व अन्नपूर्णा ढोले यांच्याविरुद्ध ३८ महाराष्ट्र सावकारी अधिनियम २0१४ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.