दुकानाचा बेकायदा ताबा; सीसीटीव्ही फुटेज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 02:27 AM2017-11-20T02:27:08+5:302017-11-20T02:31:27+5:30
मोहम्मद अली रोड परिसरातील दुकानामध्ये बुधवारी रात्री उशिरा दुकानाचे कुलूप तोडून गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी दुकानाचा बेकायदा ताबा केला. या प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांनी रविवारी या परिसरातील काही दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. या फुटेजमध्ये बुधवारी रात्री घडविण्यात आलेला हैदोस कैद झाल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मोहम्मद अली रोड परिसरातील दुकानामध्ये बुधवारी रात्री उशिरा दुकानाचे कुलूप तोडून गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी दुकानाचा बेकायदा ताबा केला. या प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांनी रविवारी या परिसरातील काही दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. या फुटेजमध्ये बुधवारी रात्री घडविण्यात आलेला हैदोस कैद झाल्याची माहिती आहे. अब्दुल हबीब अब्दुल सलाम (६0) यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मोहम्मद अली रोडवर हैदराबाद येथील शब्बीरभाई कादरभाई यांचे बेरार सोडा फॅक्टरी नावाचे दुकान आहे. त्यांनी अब्दुल हबीब यांच्या वडिलांना व्यवसायाकडे लक्ष देण्यासाठी मुखत्यार म्हणून नेमले होते. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर अब्दुल हबीब हे दुकानाचे काम सांभाळत असतानाच दुकानाचे मालक, अब्दुल हबीब आणि मूळ भाडेकरू या तिघांमध्ये दिवाणी न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात खटला सुरू आहे. दुकानाशी संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना मालकाने हे दुकान काही लोकांना विकले. मूळ मालकाने व त्याच्यापासून मालमत्ता विकत घेणार्या व्यक्तीने काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन बुधवारी रात्री उशिरा दुकानाचे कुलूप तोडले आणि दुकानाचा बेकायदा ताबा घेतला. या प्रकरणाची तक्रार हबीब यांनी केली असून, पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा उलगडा ‘लोकमत’मध्ये झाल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांनी रविवारपासून चौकशीस प्रांरभ केला. सोबतच या परिसरातील दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
हबीब यांचे बयान घेतले
अब्दुल हबीब यांची शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांनी चौकशी केली. माने यांनी हबीब यांना कार्यालयात बोलावून घेत जातीने चौकशी केली. यामध्ये हबीब यांनी केव्हा पोलीस तक्रार केली होती, त्यावर काय कारवाई झाली, यासह अनेक बाबींसंदर्भात शहर पोलीस उपअधीक्षकांनी चौकशी केली आहे.