पूर्णा नदीकाठावर २५ ब्रास वाळूचा अवैध साठा जप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 01:51 PM2019-11-16T13:51:02+5:302019-11-16T13:51:09+5:30
बाजारभाव दराने या वाळू साठ्याची किंमत १ लाख ५० हजार रुपये आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : म्हैसांग येथील पूर्णा नदीकाठावर २५ ब्रास वाळूचा अवैध साठा जप्त करून, जप्त केलेला १ लाख ५० हजार रुपये किमतीचा वाळू साठा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमा करण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी शुक्रवारी केली.
जिल्हास्तरीय आकस्मिक धाड तपासणी पथकाने अकोला तालुक्यातील म्हैसांग येथे पूर्णा नदीकाठाची पाहणी केली असता, नदीकाठावर विविध ठिकाणी वाळूची अवैध साठवणूक करण्यात आली असून, साठवणूक केलेल्या वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. त्यानुसार पूर्णा नदीकाठावर विविध ठिकाणी २५ ब्रास वाळूचा अवैध साठा जप्त करण्यात आला. बाजारभाव दराने या वाळू साठ्याची किंमत १ लाख ५० हजार रुपये आहे. जप्त करण्यात आलेला वाळूचा अवैध साठा जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी केली.
नदीकाठावर वाळूचे अवैध उत्खनन!
म्हैसांग येथील पूर्णा नदीकाठावर विविध ठिकाणी वाळूचे अवैध उत्खनन सुरू असून, साठवणूक केलेल्या वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. जप्त करण्यात आलेल्या वाळूच्या अवैध साठ्यावर कोणीही दावा केला नाही, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी दिली.