स्कूल बॅगमधून दारूची अवैध विक्री
By admin | Published: April 24, 2017 01:38 AM2017-04-24T01:38:47+5:302017-04-24T01:38:47+5:30
एक अटकेत, दारू जप्त, दारू विक्रीचा अजब फंडा
अकोला : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरावर असलेले वाइन बार, वाइन शॉप आणि बीअर शॉपी बंद झाल्यानंतर दारूच्या अवैध विक्रीला उधाण आले असून, यासाठी नवनवीन फंडे वापरण्यात येत असल्याचे खदान पोलिसांनी रविवारी सायंकाळी केलेल्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. गोरक्षण रोडवर स्कूल बॅगमधून दारू विक्री करणाऱ्यास खदान पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याच्याजवळून पाच हजार ४०० रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.
गोरक्षण रोडवर एक मुलगा स्कूल बॅगमधून विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करीत असल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाली. यावरून खदान पोलिसांनी गोरक्षण रोडवर फिरणाऱ्या सुभाष डिगांबर लहाळे (२७, रा. अन्वी मिझार्पूर) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील स्कूल बॅग तपासली. सदर बॅगमध्ये पोलिसांना पाच हजार ४०० रुपयांची ३६ विदेशी दारूचे क्वॉर्टर मिळून आले. शहरातील दारूची अनेक दुकाने बंद झाल्यानंतर अशाप्रकारचे नवनवीन फंडे वापरून देशी आणि विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.