सात सीमकार्डची बेकायदेशीर विक्री
By admin | Published: August 3, 2015 01:54 AM2015-08-03T01:54:31+5:302015-08-03T01:54:31+5:30
शनी साई मोबाइलचा संचालक ताब्यात, ‘एटीसी’ची कारवाई.
अकोला - बनावट दस्तऐवज व खोट्या स्वाक्षरीच्या आधारे सीमकार्डची बेकायदेशीर विक्री करणार्या जुने शहरातील डाबकी रोडवरील शनी साई मोबाइलच्या संचालकाविरुद्ध डाबकी रोड पोलिसांनी रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याला दुपारी ताब्यात घेण्यात आले असून, निरक्षर महिलेची स्वाक्षरी करूनही या ४ सीमकार्डची विक्री करण्यात आल्याचे समोर आले आहे. शनी साई मोबाइल दुकानाचा संचालक तसेच ज्ञानेश्वरनगरमधील रहिवासी गोविंद पुरुषोत्तम शेंडोले (२२) याने शिवाजीनगर येथील अनिल किसनराव बुलबुले यांच्या दस्तऐवजांचा वापर करून व त्यांची बनावट स्वाक्षरी करीत डोकोमो कंपनीच्या ३ सीमकार्डची बेकायदेशीर विक्री केली. यासोबतच ज्ञानेश्वरनगर येथील रहिवासी व निरक्षर असलेली महिला अन्नपूर्णा शिवलाल वडाळ यांच्या दस्तऐवजांचा वापर करीत व खोटी स्वाक्षरी करून ४ सीमकार्डची बेकायदेशीर विक्री केली. दहशतवादविरोधी सेलने रविवारी डाबकी रोडवरील गोविंद शेंडोले याला याच प्रकरणात ताब्यात घेतले. त्याने सात सीमकार्डची बेकायदेशीर विक्री केल्याचे समोर आले. या प्रकरणी गोविंद शेंडोले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.