रेतीचे अवैध उत्खनन : तुलंगा खुर्द येथील सरपंच पतीसह दोघांवर ३.१६ लाखांची दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:19 AM2021-03-16T04:19:34+5:302021-03-16T04:19:34+5:30
तुलंगा खुर्द गावाला लागून असलेल्या गावठाणाच्या जागेतून रेतीचे अवैध उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक सुरू असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने दि. २४ ...
तुलंगा खुर्द गावाला लागून असलेल्या गावठाणाच्या जागेतून रेतीचे अवैध उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक सुरू असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने दि. २४ आणि २६ फेब्रुवारी रोजीच्या अंकात प्रकाशित करताच संबंधित महसूल विभाग जागा झाला. तहसीलदार दीपक बाजड यांनी वृत्ताची दखल घेत मंडळ अधिकारी व तलाठ्यास पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. पंचनाम्यामध्ये २० ब्रास रेतीचे उत्खनन करून अवैध वाहतूक करण्यात आल्याचे उघड झाले होते. तसा अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अहवालानुसार २० ब्राससाठी तीन लाख व स्वामित्व धनाची रक्कम ८३३ प्रति ब्रास याप्रमाणे १६ हजार ६६० रुपये, असा एकूण तीन लाख १६ हजार ६६० रुपयांचा दंड तुलंगा खुर्द येथील सरपंच पती सुरेश दलपत नेव्हल व संतोष शंकर हिवराळे या दोघांना ठोठावला आहे. दंडाची रक्कम एका महिन्याच्या आत शासन जमा करावी, अन्यथा महसुलाची थकबाकी म्हणून ही रक्कम वसूल करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आला आहे. तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी व तलाठ्याने पंचनामा सादर केला. त्यावर तहसीलदार दीपक बाजड यांनी चौकशी केली असता, सरपंच पती सुरेश नेव्हाल व संतोष हिवराळे हे दोघांनी रेतीचे उत्खनन करून अवैध वाहतूक केल्याचे निष्पन्न झाल्याने प्रत्येकी एक लाख ५८ हजार ३३० प्रमाणे दोघांवर दंडात्मक कारवाई केली आहे.