दारुची अवैधरीत्या वाहतुक करणारी कार जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 05:28 PM2019-07-15T17:28:00+5:302019-07-15T18:04:41+5:30
देशी व विदेशी दारुची अवैधरीत्या वाहतुक करीत असलेली कार जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख मिलींदकुमार बहाकर यांनी रविवारी मध्यरात्री पकडली.
अकोला - दहीहांडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोहोट्टा बाजार ते टाकळी या दरम्यान देशी व विदेशी दारुची अवैधरीत्या वाहतुक करीत असलेली कार जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख मिलींदकुमार बहाकर यांनी रविवारी मध्यरात्री पकडली. या कारमधील एक लाख २५ हजार रुपयांचा दारु साठा जप्त करण्यात आला असून मनोज गावंडे नामक इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील रहिवासी मनोज गजानन गावंडे हा त्याच्या एम एच ३० एल ८९३७ क्रमांकाच्या कारमध्ये देशी व विदेशी दारुची अवैधरीत्या वाहतुक करीत असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाचे प्रमूख मिलींदकुमार बहाकर व कर्मचाऱ्यांनी चोहोट्टा बाजार परिसरात सापळा रचला. रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास सदरची कार येताच ती अडवून तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे ५० हजार रुपयांची देशी व विदेशी दारु आढळली. या कारमधून दारुची अवैधरीत्या वाहतुक करणारा मनोज गावंडे यालाही ताब्यात घेतले. त्यानंतर दहीहांडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख मिलींदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने केली.