जिल्हय़ातील रस्त्यावर वृक्षांची अवैध कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2017 01:57 PM2017-05-21T13:57:36+5:302017-05-21T13:57:36+5:30
हिरवीगार वृक्ष आधी पेटवून नंतर त्याची अवैधपणे करण्याचे प्रकार प्रचंड वाढले.
वृक्ष पेटवून देण्याच्या प्रकारांमध्ये प्रचंड वाढ
अकोला: जिल्हय़ातील अनेक मार्गासह बाश्रीटाकळी राज्य मार्गावर असलेले हिरवीगार वृक्ष आधी पेटवून नंतर त्याची अवैधपणे करण्याचे प्रकार प्रचंड वाढले असून, ते तातडीने थांबवण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश द्यावे, अशी मागणी संवेदना क्रिएटिव्ह क्लबने जिल्हाधिकार्यांना निवेदनातून केली आहे.
अकोला-बाश्रीटाकळी या राज्य महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून हजारो वृक्ष आहेत. या रस्त्यावर कायमस्वरूपी त्या वृक्षांची सावली आहे. तसेच ती झाडे पक्ष्यांची निवासस्थाने आहेत. त्या हिरव्यागार वृक्षांची कत्तल करण्यासाठी आधी पेटवून देण्याचा अघोरी प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. झाडाच्या बुंध्याशी आग लावून आधी त्या वृक्षांना पाडण्यात येते. त्यानंतर लाकूड कापून रातोरात लंपास केली जातात. सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा असलेल्या रस्त्यावर हे वृक्ष आहेत. त्याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. त्याचवेळी शासनाकडून कोट्यवधी वृक्ष लावण्याचा संकल्प केला जातो, हा विरोधाभासही यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. त्यातच शासनाच्या वृक्ष वाचवा संदेश देणारी दिंडी शुक्रवारी गेली. त्यावेळी चार वृक्ष पेटवून दिलेले होते, हे विशेष. तर २0 वृक्ष जागेवरच सुकलेली असल्याचेही चित्र आहे. हा भयंकर प्रकार तातडीने थांबवण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश द्यावे, अशी मागणी संवेदना क्रिएटिव्ह क्लबने जिल्हाधिकार्यांना निवेदनातून केली आहे.