जिल्हा बदली अंतर्गत महापालिका शाळांमध्ये शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या!
By नितिन गव्हाळे | Published: July 18, 2024 09:36 PM2024-07-18T21:36:13+5:302024-07-18T21:36:29+5:30
संचमान्यता, बिंदूनामावली प्रसिद्ध नसताना १७ शिक्षक रूजू कसे?
अकोला: जिल्हा बदलीअंतर्गत शिक्षण विभागाकडून महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या करण्यात येत आहेत. सेवाज्येष्ठता यादी, संचमान्यता आणि बिंदूनामावली अद्ययावत करण्यात आली नसतानाही महापालिकेच्या उर्दू शाळांमध्ये १७ शिक्षक कसे रूजू करण्यात आले? असा सवाल महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पाठविलेल्या निवेदनातून केला आहे.
अकोला महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये सन २०१६-१७ पासून सेवाज्येष्ठता यादी, संचमान्यता आणि बिंदूनामावली अद्ययावत करण्यात आली नाही. त्यामुळे कोणत्या संवर्गाचे शिक्षक कमी आहेत किंवा जास्त आहे. हे स्पष्ट झालेले नाही. असे असतानाही जिल्हा बदली अंतर्गत महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये १७ शिक्षक कसे काय रूजू करून घेण्यात आले? हा प्रकार नियमबाह्य असल्याचा आरोप उर्दू शिक्षक संघटनेने निवेदनातून केला आहे. तसेच महापालिकेचा शिक्षण विभाग म्हणतो की, यावर्षी उर्दू माध्यमाचे १२ शिक्षक कमी आहेत.
यावरून पुन्हा तीच पुनरावृत्ती करण्यात येत असल्याचेही निदर्शनास येत आहे. प्रशासनाचे आदेश नसताना, शिक्षण विभागाने सर्व बाबी तपासून, योग्य त्या शिक्षकांना समावेशित करून घ्यावे. प्रामाणिक शिक्षकांवर अन्याय करू नये. अशी मागणीही राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सरदार खान, उपाध्यक्ष मगफूर अहेमद, कार्याध्यक्ष मो. हफीज शे. सईद, सचिव सै. रशीद फतेह मोहम्मद, सईद खान, शहजाद परवेज खान, शमा अंजूम अ. शकूर आदींनी केली आहे.
पूर्णवेळ प्रशासन अधिकारी द्या
राज्य उर्दू शिक्षक संघटनेने मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात, महापालिकेच्या शिक्षण विभागात पूर्णवेळ प्रशासन अधिकारी नसल्यामुळे शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. याबाबत वारंवार निवेदन, तक्रारी दिल्यानंतर दखल घेण्यात आलेली नाही. महापालिका प्रशासनाने शिक्षण विभागाला पूर्णवेळ प्रशासन अधिकारी द्यावा. अशी मागणी उर्दू शिक्षक संघटनेने केली आहे.