गौणखनिजाची अवैध वाहतूक सुसाट; अपघाताच्या घटनांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:23 AM2021-08-21T04:23:09+5:302021-08-21T04:23:09+5:30
अकोट: तालुक्यातील पोपटखेड मार्गावर गौणखनिजाची अवैध वाहतूक सुरू असून, ही अवजड वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. याकडे महसूल ...
अकोट: तालुक्यातील पोपटखेड मार्गावर गौणखनिजाची अवैध वाहतूक सुरू असून, ही अवजड वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ही वाहतूक स्थानिक आदिवासी बांधवांच्या जीवावर उठली आहे. गत दोन दिवसांपूर्वी अवजड वाहनाने चिरडल्याने चुन्नीलाल गवते यांचा मृत्यू झाला होता. या मार्गावर अपघातांच्या घटनेत वाढ झाली असून, याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन कारवाईची मागणी होत आहे.
पोपटखेड मार्गावर गौणखनिज वाहतूक करणारे वैध-अवैध अंदाजे २०० वाहने चालतात. या वाहनामुळे रस्त्याची चाळणी झाली. हा रस्ता नरनाळा किल्ला व सातपुडा जंगलातील पर्यटन विशेषतः आदिवासी बांधवांच्या सर्व उपयोगी आहे. या भागात आदिवासी बहुल गावे आहेत. पुनर्वसन झालेली गाव आहेत. आदिवासी समाजातील बहुतांश लोक हे पायदळ रस्त्याचा वापर करतात, परंतु या परिसरातील गौणखनिज वाहतूक करणारी वाहने तपासणीसाठी महसूल विभागाचा नाकाही या रस्त्याने दिसून येत नाही. एका राॅयल्टीवर अनेक फेरी मारुन गौणखनिजाची अवैध वाहतूक सुरु असते. त्यामुळे भरघाव वाहने चालविताना अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. गत दोन दिवसांपूर्वी चुन्नीलाल गवते यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. या घटना टाळण्यासाठी कारवाईची मागणी होत आहे.
---------------------------
अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी
अकोट तालुक्यात खदान व गौणखनिजाची नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या दोषीवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येते, परंतु खदान व गौणखनिज वाहतुकीला आळा घालण्याची जबाबदारी असताना दुर्लक्ष करणारे अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई केली काय?, असा प्रश्न स्थानिकांमध्ये उपस्थित होत आहे.