‘आयएमए’चा आज ‘व्हाइट अलर्ट’ : देशभरातील ४ लाख डॉक्टर पेटवतील एक मेणबत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 11:20 AM2020-04-22T11:20:55+5:302020-04-22T11:21:01+5:30
देशभरातील ४ लाख सदस्य डॉक्टर्स आणि रुग्णालये एक-एक मेणबत्ती पेटवून राष्ट्राला ‘व्हाइट अलर्ट’ देणार आहेत.
अकोला : देशभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी भारतातील डॉक्टर्स जिवापाड प्रयत्न करत आहेत. तरीही डॉक्टरांवर होणारे हल्ले आणि समाजाकडून त्यांची होणारी वंचना यामध्ये वाढ होत आहे. या अनुचित घटनांचा प्रतीकात्मक निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनचे देशभरातील ४ लाख सदस्य डॉक्टर्स आणि रुग्णालये एक-एक मेणबत्ती पेटवून राष्ट्राला ‘व्हाइट अलर्ट’ देणार आहेत. या अनुषंगाने ‘आयएमए’ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने २२ व २३ एप्रिल २०२० रोजी शांततापूर्ण कार्यक्रम आखण्यात आला आहे.
कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या, आयएमएचे सदस्य असलेल्या डॉ. लक्ष्मीनारायण रेड्डी या आॅर्थोपेडिक सर्जन असलेल्या तरुण डॉक्टरचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला. या डॉक्टरच्या अंत्यसंस्कारामध्ये तेथील स्थानिक लोकांनी अडथळा निर्माण केला. अंत्ययात्रेसाठी आलेल्या डॉक्टरच्या शोकाकुल परिवारावर अमानुष हल्ला केला गेला. एवढेच नव्हे तर डॉक्टरच्या मृतदेहाबाबत अत्यंत अशोभनीय, असंस्कृत आणि अमानवी वर्तन तेथील समाजकंटकांनी केले. अशाच घटनांची पुनरावृत्ती डॉ. सायमन आणि डॉ. सिओलो यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराबाबत झाली. या साºया घटनांचा निषेध म्हणून आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी हिंसाचारविरोधी केंद्रीय कायदा व्हावा या मागणीसाठी बुधवार दि. २२ एप्रिल २०२० रोजी ‘आयएमए’च्यावतीने राष्ट्राला एक पांढरा इशारा देण्यात येणार आहे. या दिवशी रात्री ९ वाजता भारतातील ‘आयएमए’चे ४ लाख सदस्य डॉक्टर्स आणि रुग्णालये एक-एक मेणबत्ती पेटवून ठेवतील आणि राष्ट्राला पांढरा इशारा देतील, असे ‘आयएमए’, अकोलाने कळविले आहे.