‘जलयुक्त शिवार’ची कामे तातडीने सुरू करा!
By admin | Published: March 19, 2015 01:43 AM2015-03-19T01:43:43+5:302015-03-19T01:43:43+5:30
विभागीय आयुक्तांचे निर्देश; अकोला जिल्ह्यातील कामांचा घेतला आढावा.
अकोला: जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या २00 गावांमध्ये तातडीने कामे सुरू करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी बुधवारी येथे दिले.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या डॉ.के.आर.ठाकरे सभागृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बालेत होते. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील कामाचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी प्रामुख्याने जिल्हाधिकारी अरुण शिंदे, विभागीय कृषी सहसंचालक एस.आर. सरदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रमोदसिंह दुबे उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या २00 गावांमध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांपैकी प्रत्येक गावात किमान एक-दोन जलसंधारणाची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त राजूरकर यांनी दिले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात जास्तीत-जास्त जलसंधारणाची कामे करण्याच्या सूचना देत, यंत्रणानिहाय जिल्ह्यातील कामाचा आढावा विभागीय आयुक्तांनी यावेळी घेतला. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद, कृषी विभाग, पाटबंधारे, लघू सिंचन व वन विभागासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
*गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य द्या!
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रामुख्याने तलाव आणि बंधार्यांमधील गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य देऊन, गाळ काढण्याची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.
*सिंचन विहिरींची कामे पूर्ण करा!
जिल्ह्यात धडक सिंचन व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या सिंचन विहिरींची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त राजूरकर यांनी या आढावा बैठकीत दिले.