आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेजी आली तरच सोन्याच्या भावावर परिणाम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 05:01 PM2019-09-21T17:01:11+5:302019-09-21T17:14:38+5:30
सोन्याचे भाव दसरा-दिवाळीतही कायम राहतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय जेम्स अॅण्ड ज्वेलरीचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
- संजय खांडेकर
अकोला : वित्तमंत्र्यांकडून करकपातीची घोषणा होताच शेअर बाजाराचा सेन्सेक्स दोन हजार अंकांनी उसळला. त्याचा परिणाम सराफा बाजारावरही गुरुवारी झाला. त्यामुळे सोन्याचे भाव ४०० रुपयांनी घसरले; मात्र ही घसरण फार नाही. जर आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढली अन् अमेरिकेत उघडणाऱ्या बाजारपेठेत तशी तेजी आली, तरच सोन्याच्या भावावर परिणाम होतील आणि सोन्याचे भाव घसरतील, अन्यथा सोन्याचे भाव दसरा-दिवाळीतही कायम राहतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय जेम्स अॅण्ड ज्वेलरीचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना दिली.
देशात येत असलेल्या मंदीला रोखण्यासाठी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी करकपातीची घोषणा करीत शेअर बाजारास बुस्टर डोस दिला. त्यामुळे कार्पोरेट कंपन्यांवरील शेअरवर लागणाºया करामध्ये ५ टक्के सूट मिळाली आहे.सरचार्ज आणि मिनिमम अल्टरनेट टॅक्समध्ये ३ टक्के सूट मिळाली. निफ्टी-फिफ्टी कंपन्यांच्या ईपीएसमध्ये ८ ते १० टक्क्यांनी होत असलेली वाढ, सोबतच नफामध्ये वाढण्याचे संकेत मिळाल्याने बुधवारी कमालीचा कोसळलेला शेअर बाजार गुरुवारी तब्बल दोन हजार अंकांनी उसळला. दहा वर्षांतही एवढा सेन्सेक्स उसळला नव्हता. त्यामुळे देशभरासोबतच अकोल्यातील गुंतवणूकदार आणि शेअर ब्रोकरमध्ये उत्साहाचे वातावरण पसरलेले होते. शेअर बाजारात आलेली तेजी अशीच कायम राहिली आणि बँकिंग क्षेत्रात जर तरलता आली तर देशातील आर्थिक मंदी काही प्रमाणात का होईना, दूर होण्याची शक्यता आहे. मंदीतून सावरण्याच्या दृष्टीने वित्तमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे; मात्र बाजारपेठेतील अर्थव्यवस्था अधिक गतिशील करण्यासाठी काही ठोस निर्णय घेण्याचीदेखील गरज आहे, असे मत अकोल्यातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
फ्युचर बाजारात शॉर्ट सेलची जी परिस्थिती होती, ती कव्हर केल्या गेल्यामुळे गुरुवारी बाजारपेठेत काही तासांत तेजी आली; मात्र ज्या कंपन्यांचे शेअर कमालीचे पडले, त्यात अद्याप काहीही परिणाम जाणवलेला नाही. अशांमध्ये यस बँक, डीएचएफएल, जे.पी. असोसिएट, व्हिडिओकॉन, आर-पॉवर आदींसारख्या कंपन्यांचा समावेश आहे; मात्र अनेक कार्पोरेट कंपन्यांच्या शेअरच्या किमतीत मोठा बदल झाला. यापैकी आॅटोमोबाइल्स कंपन्यांचा जास्त समावेश दिसून आला. सहा महिन्यांतील मंदीत पहिल्यांदा बाजारात तेजी दिसून आल्याने गुंतवणूकदार सुखावला आहे.
-वित्तमंत्री सीतारामन यांच्या निर्णयाचे देशभरातील व्यापाºयांमध्ये स्वागत होत आहे. मोठ्या उद्योजकांना प्राप्तिकरात दिलेल्या सूटमुळे भारतात विदेशी गुंतवणुकीला वाव मिळेल. अप्रत्यक्षपणे चायनाला आपले बिºहाड गुंडाळावे लागेल. वित्तमंत्र्यांच्या या निर्णयामुळे भारतीय बाजारपेठेत निश्चितच तेजी येईल. जर आॅक्टोबरमध्ये रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केली, तर भारतीय उद्योजकांना नवीन उद्योग उभारण्यासाठी मदत होईल.
-अशोक डालमिया, ‘कॅट’चे राष्ट्रीय सचिव, अकोला.
- आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढली तर चांगले चित्र दिसेल. डॉलरच्या तुलनेत रुपया अधिक मजबूत होण्याची अनेकजण वाट पाहत आहेत. शेअर बाजारातील आॅटोमोबाइल्सच्या कार्पोरेट कंपन्यांमध्ये मोठा बदल दिसत आहे; मात्र याचा परिणाम प्रत्यक्षात वाहन विक्रीत झाला पाहिजे. सणासुदीच्या तोंडावर वाहने स्वस्त मिळाली तर बाजारात चैतन्य येईल.
-हंसराज अग्रवाल, शेअर बाजर तज्ज्ञ, अकोला.