प्रभाव लोकमतचा : कृषी तंत्र विद्यालयाच्या गलथान कारभाराच्या चौकशीसाठी समिती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 04:20 PM2019-07-24T16:20:43+5:302019-07-24T16:21:09+5:30
कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी वृत्ताची दखल घेत, संबंधित विद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकांना मंगळवारी पाचारण करून त्यांची कानउघाडणी केली .
अकोला: प्राध्यापक वर्ग शिकवित नाहीत. तासिका घेत नाहीत, अशी तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यावरच गुन्हा दाखल केल्यामुळे प्रकाशझोतात आलेल्या निंबी मालोकार येथील कृषी तंत्र विद्यालयाच्या गलथान कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका असे वृत्त लोकमतने मंगळवारी प्रकाशित केले. या वृत्ताची डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी दखल घेत, प्राचार्य व प्राध्यापकांवर कारवाई करणार असून, नागोराव राऊत या विद्यार्थ्यावरील अन्याय दूर करुन तसेच चौकशी समिती गठीत करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
निंबी मालोकार येथील कृषी तंत्र विद्यालयात कारभार ढेपाळला आहे. लाखो रुपये अनुदान मिळूनही विद्यार्थ्यांना कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत. प्रात्यक्षिकाच्या नावाखाली विद्यार्थी, विद्यार्थिनींना निंदण-खुरपण, वखर-डवरण्यासह गुरे राखण्यासारखी कामे करावी लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. तसेच कृषी तंत्र विद्यालयातील नागोराव राऊत या विद्यार्थ्याने तक्रार केल्यावर, कृषी विद्यापीठातून चौकशीसाठी आलेल्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्याने वाद घातल्यावर त्याच्याविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. याबाबत लोकमतने सोमवारी कृषी तंत्र विद्यालय जाऊन आढावा घेतला असता, या ठिकाणी गलथान कारभार सुरू असल्याचे दिसून आले होते. याबाबतचे वृत्त मंगळवारी प्रकाशित झाल्यावर, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी वृत्ताची दखल घेत, संबंधित विद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकांना मंगळवारी पाचारण करून त्यांची कानउघाडणी केली आणि पडीत शेती, चाºयाअभावी कृश झालेले पशुधन, बंद पडलेल्या वसतिगृहाबाबत जाब विचारला. तसेच प्राचार्यांना यासंदर्भात लेखी खुलासा मागविला आहे. (प्रतिनिधी)
निंबी मालोकार येथील कृषी तंत्र विद्यालयातील गलथान कारभाराची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात येणार आहे. समितीचा अहवाल आल्यावर दोषींवर कारवाई करू. तसेच त्या विद्यार्थ्यावर झालेला अन्याय दूर करण्यात येईल आणि कृषी व तंत्र विद्यालयाची इमारत, वसतिगृह बांधकामासाठी ४ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात येईल.
-डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
कृषी तंत्र विद्यालयातील गलथान कारभाराची चौकशी करण्यासाठी बुधवारी अकोल्यात येणार आहे. पडीत जमीन, विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल कृषी विद्यापीठाकडे पाठपुरावा करुन दोषींवर कारवाईसाठी शिफारस करु.
- विनायक सरनाईक, सदस्य, कार्यकारी परिषद, पं.दे.कृ.वि.