ग्रामस्तरावर पूर्वपावसाळी अभियान राबवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:16 AM2021-06-02T04:16:02+5:302021-06-02T04:16:02+5:30
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाळ्याच्या दिवसांत जलजन्य व साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी ग्रामस्तरावर पूर्वपावसाळी अभियान राबविण्याचे ...
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाळ्याच्या दिवसांत जलजन्य व साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी ग्रामस्तरावर पूर्वपावसाळी अभियान राबविण्याचे पत्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मंगळवारी जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी (बीडीओ) व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पाठविले आहे.
पावसाळ्यात जलजन्य व साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील ग्रामस्तरावर पाणी पुरवठा व स्वच्छतेच्या दृष्टीने पूर्वपावसाळी अभियान राबविण्यासंदर्भात जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये
नळ पाणी पुरवठा योजनेचा उद्भव विहीर असल्यास व विहीर नादुरुस्त असल्यास दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात यावे, पाणी पुरवठा योजनेचा उद्भव विहीर, विंधन विहीर किंवा कूपनलिका असल्यास उद्भवाजवळ पावसाचे व पुराचे पाणी साचणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी, नळ पाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा खंडित होऊ नये यासाठी अतिरिक्त पंप संच तयार ठेवणे, ग्रामपंचायत स्तरावर ब्लिचिंग पावडरचा मुबलक साठा उपलब्ध ठेवणे, पाणी पुरवठा योजनांची दुरुस्तीची कामे तातडीने करणे, जलवाहिन्यांवरील गळत्या काढणे, नदी व नाल्यांच्या ठिकाणी जलवाहिनी क्षतिग्रस्त होणार नाही याबाबत काळजी घेणे, सांडपाण्याच्या नाल्यांची साफसफाई करणे इत्यादी उपाययोजनांची कामे ग्रामपंचायत स्तरावर करण्यासाठी पूर्वपावसाळी अभियान राबविण्याचे पत्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पाठविले आहे.