बैलगाडीस धडक देणा-या टिप्पर चालकास कारावास
By admin | Published: September 20, 2016 01:28 AM2016-09-20T01:28:23+5:302016-09-20T01:28:23+5:30
न्यायालयाने चार महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.
अकोला, दि. १९- बैलगाडीस धडक देऊन बैलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या टिप्पर चालकास नववे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एम.डी. नन्नावरे यांच्या न्यायालयाने सोमवारी चार महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.
वल्लभनगर येथील नवृत्ती प्रकाश हलवणे हे बैलगाडीमध्ये नादुरुस्त पाण्याचे मोटारपंप घेऊन अकोल्याकडे येत होते. कासली फाट्यानजीक एमएच १४ एएस ८५0७ क्रमांकाच्या टिप्पर चालक घनश्याम मधुकर झाडे (सांगवी बाजार) याने बैलगाडीस जोरदार धडक दिली. यात बैल जागीच ठार झाला आणि नवृत्ती हलवणे हे जखमी झाले. प्रकाश हलवणे यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी टिप्परचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अपघाताचा तपास पोलीस कर्मचारी नारायण गुलाबराव ताठे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सुनावणीदरम्यान टिप्परचालकाविरुद्ध दोष सिद्ध झाल्याने नववे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एम.डी. नन्नावरे यांच्या न्यायालयाने आरोपी घनश्याम झाडे याला कलम २७९ मध्ये एक महिन्याचा साधा कारावास, एक हजार रुपये दंड आणि कलम ४२७ मध्ये तीन महिन्यांचा साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.