जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींमध्ये येणार ‘प्रशासकराज’, जिल्हा परिषद ‘सीईओ’ करणार प्रशासकांची नेमणूक
By संतोष येलकर | Published: October 1, 2022 06:37 PM2022-10-01T18:37:54+5:302022-10-01T18:39:00+5:30
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत.
अकोला : ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक नियुक्तीची कार्यवाही करण्याचे निर्देश शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्राद्वारे देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक नेमणुकीची कार्यवाही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत (सीईओ) करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासकराज’ येणार आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने राज्य निवडणूक आयोगामार्फत नियोजन करण्यात येत आहे; मात्र संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रभागरचनेनंतर मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणुकांसाठी दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका मुदत समाप्तीपूर्वी घेणे शक्य होणार की नाही, याबाबत शंका असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक नियुक्तीची कार्यवाही करण्याचे निर्देश शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत ३९ सप्टेंबर रोजीच्या पत्राद्वारे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये मुदत संपत असलेल्या एका ग्रामपंचायतीसह डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या २६५ अशा जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक नेमणुकीची कार्यवाही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत (सीईओ) करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांची नेमणूक करण्याच्या कार्यवाहीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ३० सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.
अशी आहे प्रशासकांची नेमणूक करावयाच्या ग्रामपंचायतींची संख्या! -
तालुका - ग्रा. पं.
अकोला - ५४
अकोट - ३७
तेल्हारा - २३
मूर्तिजापूर - ५१
बाळापूर - २६
बार्शिटाकळी - ४७
पातूर - २८
एकूण - २६६