अकोल्यात शेळीचा फोटो देऊन पशुसंवर्धन अधिकाऱ्यास करून दिली शेळीगट वाटपाची आठवण!
By संतोष येलकर | Published: July 15, 2023 04:07 PM2023-07-15T16:07:50+5:302023-07-15T16:08:30+5:30
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या शेळीगट वाटप योजनेत लाभार्थी हिस्सा रक्कम जमा केलेल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अद्यापही शेळीगटाचे वाटप करण्यात आले नाही.
अकोला : जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या शेळीगट वाटप योजनेत लाभार्थी हिस्सा रक्कम जमा केलेल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अद्यापही शेळीगटाचे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी हा मुद्दा उपस्थित करीत, शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्यांनी शेळीचा फोटो जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना भेट देऊन, जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शेळीगट वाटप करण्याची आठवण करून दिली.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या (मागासवर्गीय ) वस्तीचा विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात सर्वसमावेशक कामांचे वाटप करण्याची मागणीही सभेत करण्यात आली. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शेळीगट वाटप योजनेंतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षात निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी दहा टक्के लाभार्थी हिश्शाची रक्कम जमा केल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना गेल्या ३१ मार्चपर्यंत शेळीगटाचे वाटप करणे अपेक्षित होते; परंतु जिल्ह्यातील ३६४ लाभार्थ्यांना अद्यापही शेळीगटाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना शेळीगटाचा लाभ मिळणार तरी कधी, अशी विचारणा जिल्हा परिषदेतील शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य डाॅ. प्रशांत अढाऊ यांनी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत केली, तसेच डाॅ. अढाऊ शिवसेना ठाकरे गटाचे गटनेता गोपाल दातकर यांनी शेळीचा फोटो जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. गजानन दळवी यांना भेट देत, त्यांना शेळीगट वाटप करण्याची आठवण करून दिली.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रस्तावित कामांसाठी जिल्हा परिषद सदस्यांचे पत्र घेऊन कामांचे सर्वसमावेशक वाटप करण्यात यावे, अशी मागणी सदस्य रायसिंग राठोड, प्रकाश आतकड, चंद्रशेखर चिंचोळकर यांनी सभेत रेटून धरली. जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, उपाध्यक्ष सुनील फाटकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.के. ठमके, समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, शिक्षण सभापती माया नाईक, महिला व बालकल्याण सभापती रिजवाना परवीन, कृषी व पशुसंवर्धन सभापती योगिता रोकडे, सत्तापक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, गटनेता गोपाल दातकर, डाॅ. प्रशांत अढाऊ, मीना बावणे, गजानन पुंडकर, चंद्रशेखर चिंचोळकर, रायसिंग राठोड, प्रकाश आतकड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सभेचे सचिव कालिदास तापी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.