अकोला शहरात जवाहर नगरातील दोन कॅफेना ठोकले टाळे; मनपा व सिव्हिल लाइन पोलिसांची कारवाई
By Atul.jaiswal | Published: December 15, 2023 05:36 PM2023-12-15T17:36:27+5:302023-12-15T17:37:02+5:30
महानगरपालिका क्षेत्रातील पुर्व झोन अंतर्गत जवाहर नगर येथील ज्वाईन कॅफे आणि ब्लॅक कॅफेमध्ये युवक-युवती असभ्य वर्तन करताना आढळून आल्याने पोलीस प्रशासनाद्वारे या कॅफेंचा परवाना रद्द करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले होते.
अकोला : शहरातील जवाहन नगर भागातील दोन फुड कॅफेंमध्ये भलतेच 'उद्योग' होत असल्याच्या माहितीवरून या दोन कॅफेना टाळे ठोकण्याची कारवाई महानगर पालिका प्रशासन व सिव्हिल लाईन पोलिसांनी शनिवार, १५ डिसेंबर रोजी केली.
महानगरपालिका क्षेत्रातील पुर्व झोन अंतर्गत जवाहर नगर येथील ज्वाईन कॅफे आणि ब्लॅक कॅफेमध्ये युवक-युवती असभ्य वर्तन करताना आढळून आल्याने पोलीस प्रशासनाद्वारे या कॅफेंचा परवाना रद्द करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले होते. परंतू या कॅफेधारकांनी व्यवसाय परवाना घेतला नसल्याचे आढळून आले. त्यामुळे मनपा आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशान्वये तसेच मनपा उपायुक्त गीता वंजारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस विभागाच्या उपस्थितीमध्ये मनपा बाजार/परवाना विभागाद्वारे या दोन्ही कॅफे वर शनिवारी सील लावण्याची कारवाई करण्यात आली.
यावेळी बाजार/परवाना विभाग प्रमुख राजेश सोनाग्रे, सिव्हील लाईन पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुभाष वाघ, भुषण मोरे, बाजार/परवाना विभागाचे सुरेंद्र जाधव, गौरव श्रीवास, सनी शिरसाट, उदय ठाकुर, सुधाकर सदांशिव, निखील लोटे, पुर्व झोन कार्यालयाचे राजेश जाधव, कनिष्ठ अभियंता नरेश कोपेकर, आरोग्य निरीक्षक शैलेश पवार, पंकज पोफळी तसेच सिव्हील लाईन पोलीस स्टेशन कर्मचा-यांची उपस्थिती होती.
कॅफेंवर पोलिसांची करडी नजर
या परिसरातील नेट कॅफेसह विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी असलेल्या कॅफेमध्येही असभ्य व अश्लील वर्तन होत असल्याच्या तक्रारी सिव्हिल लाईन्स पोलिसांकडे आल्यानंतर पोलिसांनी या परिसरातील कॅफेंवर नजर ठेवली आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या कॅफेंवर कारवाई करून तेथे असभ्य वर्तन करणाऱ्या युवकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.