अकोला जिल्ह्यात १३ दिवसांत केवळ ३६८ बालकांचा शाळांमध्ये प्रवेश निश्चित
By Atul.jaiswal | Published: April 25, 2023 02:23 PM2023-04-25T14:23:45+5:302023-04-25T14:24:06+5:30
प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याच्या १३ एप्रिलपासून जिल्ह्यात २५ एप्रिलपर्यंत केवळ ३६८ बालकांचा प्रवेश निश्चित झाला आहे.
अकोला : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत विनाअनुदानित खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रक्रियेत संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणीमुळे खोडा निर्माण झाल्याने पालकांची चिंता वाढली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याच्या १३ एप्रिलपासून जिल्ह्यात २५ एप्रिलपर्यंत केवळ ३६८ बालकांचा प्रवेश निश्चित झाला आहे.
आरटीईअंतर्गत जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या १९० शाळांमध्ये १९४६ जागा राखीव आहेत. या जागांसाठी ७११२ अर्ज प्राप्त झाले होते. राज्यस्तरावर काढण्यात आलेल्या सोडतीत जिल्ह्यातील १९२४ बालकांची निवड झाली आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १३ एप्रिलपासून सुरू होऊन प्रवेशासाठी २५ एप्रिल ही अंतिम मुदत देण्यात आली होती. पहिल्या दिवसापासूनच आरटीई पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे प्रवेश निश्चितीत खोडा निर्माण झाला आहे. आरटीई पोर्टलच्या तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने जिल्ह्यातील निवड झालेल्या अनेक बालकांना अद्यापही प्रवेश निश्चित करता आलेला नाही. मंगळवार, २५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील केवळ ३६८ बालकांचेच प्रवेश निश्चित झाले आहेत. अजूनही शेकडो बालके प्रवेशपासून वंचित असल्याने त्यांच्या पालकांना मुदतवाढीमुळे दिलासा मिळाला आहे.
८ मे पर्यंत मुदतवाढ
प्रवेशासाठीची २५ एप्रिल ही यापूर्वीची अंतिम मुदत जवळ आल्यानंतरही अनेक बालकांचा शाळा प्रवेश झाला नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून ८ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शाळा प्रवेशासाठी आता पुरेसा अवधी मिळणार असल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.