शिधापत्रिकेचे काम मार्गी लागण्यासाठी सुटीच्या दिवशीही कार्यालये राहणार सुरू! प्रशासनाचा पुढाकार
By रवी दामोदर | Published: July 12, 2024 05:00 PM2024-07-12T17:00:55+5:302024-07-12T17:02:37+5:30
'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना' : प्रशासनाचा पुढाकार.
रवी दामोदर, अकोला : शासनाकडून ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ ही योजना राज्यभरात व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने शिधापत्रिकेसंबंधी कामकाजासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ प्रत्येकाला मिळावा, यासाठी पुरवठा कार्यालयालय सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांनी दिली आहे.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ही योजनेच्या लाभासाठी कागदपत्रे जमा करण्यासाठी महिलांसह नागरिकांची तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच शिधापत्रिकासंबंधित कामकाजासाठी पुरवठा विभागात नागरिकांची झुंबड होत आहे. योजनेचा लाभ महिलेला मिळावा, यासाठी पुरवठा कार्यालय सुटीच्या दिवशी म्हणजेच दि. १३ जुलै व दि. १४ जुलै रोजी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार असून, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या दिवशी उपस्थित राहून प्राधान्याने कामे पूर्ण करावी, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी माचेवाड यांनी दिले आहे.