अकोल्यात तुरीला उच्चांकी १० हजार २८५ रुपये दर; ४ हजार कट्ट्यांची आवक
By रवी दामोदर | Published: January 19, 2024 07:51 PM2024-01-19T19:51:25+5:302024-01-19T19:51:43+5:30
आणखी दर वाढण्याचा अंदाज
अकोला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शुक्रवारी तुरीला या वर्षाचा उच्चांकी १० हजार २८५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून, तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बाजार समितीत ४ हजार कट्ट्यांची आवक झाली असून, आगामी दिवसात तुरीचे आणखी दर वाढण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.
जिल्ह्यात तूर सोंगणी व काढणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या खरीप हंगामात पेरण्या उशिराने झाल्याने हंगाम लांबला. त्यात अपुऱ्या पावसामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. तुरीचे पीक ऐन फुलधारणेच्या अवस्थेत असताना अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यानंतर ढगाळ वातावरण व अळींच्या प्रकोपामुळे तुरीचे प्रचंड नुकसान झाले. सध्या तुरीची सोंगणी व काढणी सुरू आहे. जिल्ह्यात उत्पादनात प्रचंड घट झाल्याचे पहावयास मिळत आहे. एकरी एक ते दोन क्विंटलच उत्पादन होत असल्याचे चित्र आहे. बाजारातही नवीन तूर दाखल झाली असून, मुहूर्ताचा ९ हजारांवर दर मिळाला होता. आता नववर्षात तुरीच्या दरात वाढ झाली असून, शुक्रवारी तुरीला उच्चांकी १० हजार २८५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
४ हजार कट्ट्यांची आवक
बाजारात नवी तूर दाखल होत आहे. जिल्ह्यात तुरीच्या काढणीला वेग आल्याने बाजारातही तुरीची आवक वाढल्याचे चित्र आहे. शुक्रवारी तब्बल ४ हजार कट्टे तूरीची आवक झाल्याची माहिती आहे. आगामी दिवसात आणखी आवक वाढण्याची चिन्हे आहेत.
यंदा खरीप हंगामातील तुरीच्या पिकाला चांगलाच फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तुरीला मागणी आहे. उत्पादनात प्रचंड घट झाल्याचे चित्र असल्याने आगामी दिवसात तुरीचे दर वाढण्याची शक्यता आहे - बिहारी जयराज, व्यापारी, अकोला.