साठ फुट खोल विहिरीत पडलेल्या तीन माकडांची केली सुटका; वनविभागाची कामगिरी
By Atul.jaiswal | Published: June 11, 2024 05:07 PM2024-06-11T17:07:33+5:302024-06-11T17:09:16+5:30
काटेपूर्णा पासुन जवळच असलेल्या कोळंबी शेत शिवारातील देवके यांच्या विहिरीत दोन मोठे माकड व पिल्लू पडले होते.
अतुल जयस्वाल, अकोला : अकोला तालुक्यातील कोळंबी येथील ६० फुट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या तीन माकडांना वनविभागाच्या चमुने सुखरुप बाहेर काढून त्यांना जीवदान दिल्याची घटना मंगळवारी घडली.
काटेपूर्णा पासुन जवळच असलेल्या कोळंबी शेत शिवारातील देवके यांच्या विहिरीत दोन मोठे माकड व पिल्लू पडले होते. गावकऱ्यांनी माकडांना काढण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आले नाही. नंतर याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास थोरात व वनपाल गजानन इंगळे यांनी रेस्कू टीमचे इंचार्ज संघपाल तायडे, मानद वन्यजिव रक्षक बाळ काळणे, वनरक्षक प्रियंका साबळे, अक्षय खंडारे, प्रदीप खडे यांना घटनास्थळी जाऊन माकडांची सुटका करण्याबाबत सुचना दिली. रेस्क्यू टीमने घटनास्थळी गेल्यावर विहिरीचे निरीक्षण केले.
प्रथम विहिरीत माकडांपर्यंत दोराखंडाची शिडी सोडण्यात आली. परंतु, या प्रयत्नाला यश आले नाही. त्यानंतर माकडांना खाण्यासाठी अन्न देण्यात आले. थोड्यावेळाने विहिरीत जाळी सोडण्यात आली. जाळीवर प्रथम दोन माकडे आली. त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पुन्हा जाळी सोडली त्यात तिसरे माकडे आल्यानंतर जाळी बाहेर ओढण्यात आली. हे रेस्क्यू ऑपरेशन जवळपास तीन तास चालले. सर्व माकडांची सुखरुप सुटका झाल्यामुळे गावकरी आनंदीत झाले. याप्रसंगी पोलिस पाटील कानकिरड, ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.