महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना मिळावे शून्य टक्के व्याजदराने कर्ज - राज्यपाल रमेश बैस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2023 08:20 PM2023-06-10T20:20:30+5:302023-06-10T20:21:01+5:30
Governor Ramesh Bais : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळाले पाहिजे. त्यासाठी आपण सरकारशी चर्चा करणार असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.
अकोला : महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या का हाेतात, याची कारणे शोधून शेतकऱ्यांना सक्षम कसे करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. छत्तीसगडप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळाले पाहिजे. त्यासाठी आपण सरकारशी चर्चा करणार असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांचे जन्मशताब्दी वर्ष व लोकमत अकोला आवृत्तीच्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त शनिवार, १० जून रोजी सकाळी ११ वाजता हॉटेल ग्रॅन्ड जलसा येथे आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, समूह संपादक विजय बाविस्कर व्यासपीठावर उपस्थित हाेते. अध्यक्षस्थानी लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा होते.
राज्यपाल बैस म्हणाले की, छत्तीसगड राज्यामध्ये कर्ज सुविधा गावातच उपलब्ध केली आहे. साेसायटीमधून शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जाते. शेतकऱ्यांना उत्पादित केलेले धान बाजारात जाऊन विकावे लागत नाही. गावातील साेसायटी ते विकत घेऊन आपले कर्ज फेड करून घेते, त्यामुळे वसुलीचाही प्रश्न उरत नाही. या याेजनेची सर्व कागदपत्रे महाराष्ट्र सरकारला देणार आहे. सरकारने ती कागदपत्रे तपासून अशी याेजना महाराष्ट्रात लागू करता आली तर ते माेठ्या पुण्याचे काम हाेईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
राज्यपाल म्हणाले, मी जगभरात फिरत असताना कुठल्याही बाजारपेठेत मेड इन चायना वस्तू दृष्टीस पडल्या. पूर्वी मेड इन जपान दिसायचे. परंतु मला विश्वास आहे की, एकविसावे शतक हे भारताचे असेल आणि सर्वत्र मेड इन भारत दिसेल. भारत हा युवकांचा देश आहे. आमच्याकडे गुणवत्ता आहे. छोटे-छाेटे काम करणाऱ्या तरुणांसाठी छत्तीसगडमध्ये राबविल्या गेलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमाप्रमाणेच महाराष्ट्रात कुशल कारागिरांना प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र दिले, त्यांची नाेंदणी केली तर आमचे तरुण विदेशांमध्ये जातील. त्यांना रोजगार मिळेल, असेही ते म्हणाले.
प्रारंभी राज्यपाल बैस यांचा ‘लाेकमत’च्या वतीने श्रद्धेय बाबूजींवर भारत सरकारने काढलेले टपाल तिकीट, सुवर्णमुद्रा ग्रंथ, ‘बाबूजी’ कॉफी टेबल बुक तसेच स्मृतिचिन्ह देऊन डाॅ. विजय दर्डा व राजेंद्र दर्डा यांनी सत्कार केला.
लाेकमत लाेकशाहीचा आवाज
‘लाेकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा हे जननायक हाेते. त्यांनी लाेकमत हे सामान्य लाेकांचे वर्तमानपत्र बनविले. लाेकमतचा इतिहास राेमांचकारी आहे. आज लाेकमत राज्यासह गाेवा, दिल्लीत पाेहाेचला असून, लाेकमत लाेकशाहीचा आवाज बनला आहे, अशा शब्दांत राज्यपाल यांनी ‘लाेकमत’चा गाैरव केला. ते म्हणाले, “मी महाराष्ट्रात आल्यावर ‘लाेकमत’चा वाचक झालाे. आता दिल्लीत गेल्यावरही ‘लाेकमत’ वाचायला मिळताे याचे समाधान आहे. ‘लाेकमत’चे चेअरमन डाॅ. विजय दर्डा यांनी डिजिटल आवृत्तीमधून ‘लाेकमत’ला ग्लाेबल वर्तमानपत्र बनविले असून, इतर वर्तमानपत्रांच्या तुलनेत ‘लाेकमत’मध्ये ग्रामीण व शहरी बातम्यांचा समन्वय साधला जाताे, असे निरीक्षण त्यांनी नाेंदविले. ‘लाेकमत’ने राजकीय भूमिका घेऊन काेण्या एका पक्षाची पाठराखण केल्याचे दिसले नाही, मी कधीही ‘लाेकमत’ला काेणाचेही चारित्र्यहनन करताना बघितले नाही,” असे गाैरवाेद्गार त्यांनी काढले.