रेल्वेतून उतरण्याची घाई नडणार तोच रेल्वे पोलीस मदतीला धावला, महिला थोडक्यात बचावली, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
By नितिन गव्हाळे | Published: November 27, 2022 11:18 AM2022-11-27T11:18:55+5:302022-11-27T11:19:44+5:30
Akola News: रेल्वे स्थानकावर काचिगुडा एक्सप्रेसमधून उतरण्याची घाई करणाऱ्या महिला प्रवाशासोबत काल मोठा अनर्थ टळला. रेल्वे पोलीस मदतीला धावल्यामुळे तिचा जीव बचावला.
- नितीन गव्हाळे
अकोला - रेल्वे स्थानकावर काचिगुडा एक्सप्रेसमधून उतरण्याची घाई करणाऱ्या महिला प्रवाशासोबत काल मोठा अनर्थ टळला. रेल्वे पोलीस मदतीला धावल्यामुळे तिचा जीव बचावला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, ही प्रवासी महिला चालत्या रेल्वेमध्ये उतरण्याचा प्रयत्न करीत होती.
शनिवारी २६ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास अकोला स्थानकावर ड्युटीवर असताना आरपीएफचे कर्मचारी बी.आर. धुर्वे यांना, चालू रेल्वेमधून प्लॅटफॉर्मवर एक प्रवासी महिला पडताना दिसली. त्यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली अन् वेळेत महिला प्रवाशाला रेल्वेच्या बाजूला केले. या समसूचकतेमुळे महिला प्रवाशाचा जीव वाचला. धुर्वे यांच्या धाडसाचं कौतूक केलं होत आहे.
शनिवारी रात्री रेल्वे क्रमांक- १७६४१ काचीगुडा एक्सप्रेस अकोला स्थानकावरुन रवाना होत असताना, एक प्रवासी महिला धावत्या ट्रेन मधून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होती. पण त्यावेळी तिचा तोल गेल्याने ती रेल्वेच्या दारातून खाली रेल्वे जवळ पडली. बाजूला रेल्वेच्या पायऱ्यावरून खाली उतरत असलेल्या रेल्वे पोलिसाच्या कर्मचाऱ्याला ही महिला खाली पडताना निदर्शनास आली. त्यांनी लागलीच तिच्याकडे धाव घेतली आणि त्या प्रवासी महिलेला रेल्वेपासून बाजूला केलं. हा सर्व प्रकार अकोल्याच्या स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.