सकल मराठा समाजातर्फे जिल्हा बंदच्या हाकेला जिल्ह्यात साथ, कडकडीत बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 04:25 PM2023-09-08T16:25:31+5:302023-09-08T16:25:48+5:30
अकोला बंदच्या आवाहनाला जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
अकोला: जालना येथे मराठा समाज बांधवांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ अकोला जिल्हा सकल मराठा समाजातर्फे शुक्रवारी देण्यात आलेल्या बंदच्या हाकेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला.
जिल्हा बंदच्या आवाहनाला जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. विविध जातीधर्माच्या संघटना, व्यापारी संघटना, शाळा व महाविद्यालयाच्या संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक संघटना, व्यापारी अडते संघटना, व्यावसायिक ग्रेन मर्चंट असोसिएशन, हॉटेल व्यावसायिक असोसिएशन, पेट्रोल पंप असोसिएशन, अकोला बार असोसिएशन, बांधकाम व्यावसायिक संघटना, सराफा असोसिएशन आदी संघटनांच्यावतीने या बंदला पाठिंबा दिल्याने अकोला शहर व जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये अकोला शहर व जिल्ह्यातील बाजारपेठ, व्यावसायिक प्रतिष्ठाने सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली होती. जीवनाश्यक व अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या होत्या. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. - अकोला शहरात मोटारसायकल रॅली
अकोला शहरात सकल मराठा समाजाचे चार झोन करण्यात आले होते. या चार झोनमध्ये सकाळपासून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात येत होत्या.