विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणात शिक्षण विभागाला धरले धारेवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2023 06:31 PM2023-04-20T18:31:35+5:302023-04-20T18:31:49+5:30
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा गाजली : शाळांमध्ये ‘सखी-सावित्री’ समित्या गठित करण्याचे निर्देश
संतोष येलकर
अकोला : जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात एका शाळेतील विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणाचा मुद्दा बुधवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत चांगलाच गाजला. जिल्ह्यातील शाळांमध्ये ‘सखी-सावित्री’ समित्या स्थापन न केल्यामुळे निंदनीय घटना घडल्याचा आरोप करीत, या मुद्यावर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला धारेवर धरण्यात आले. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये सखी-सावित्री समिती गठित करण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देशही शिक्षण विभागाला सभेत देण्यात आले आहेत.
बार्शीटाकळी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना गेल्या महिन्यात घडली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सत्ता पक्षाचे गटनेते ज्ञानेश्वर सुलताने यांनी या प्रकरणाचा मुद्दा सभेत उपस्थित केला.१० मार्च २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांमध्ये सखी सावित्री समित्या स्थापन न केल्यामुळे व शिक्षण विभागाच्या नाकर्तेपणामुळे बार्शीटाकळी तालुक्यातील एका शाळेत निंदनीय कृत्याचा प्रकार घडला असून, त्यामुळे जिल्हा परिषदेची बदनामी झाल्याचा आरोप ज्ञानेश्वर सुलताने यांनी केला. या प्रकरणाला शिक्षणाधिकारी, संबंधित गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख जबाबदार असल्याचा आरोप करीत, जबाबदारी स्वीकारून, जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये सखी-सावित्री समिती गठित करण्याची मागणीही त्यांनी सभेत केली.
त्यानुसार जिल्ह्यातील शाळांमध्ये सखी-सावित्री समिती गठित करण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला सभेत देण्यात आले. यासोबतच विविध मुद्यांवर सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, उपाध्यक्ष सुनील पाटकर, समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, सत्तापक्ष गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, सदस्य डॉ. प्रशांत अढाऊ, गजानन पुंडकर, चंद्रशेखर चिंचोळकर, प्रकाश आतकड, मीना बावणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दुधाळ जनावरे वाटपाची चौकशी करण्याचे निर्देश!
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या दुधाळ जनावरे वाटपाच्या योजनेत गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करीत, यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी सदस्य डॉ. प्रशांत अढाऊ यांनी सभेत केली. त्यानुसार यासंदर्भात सात दिवसांत चौकशी करण्याचे निर्देश सभेत देण्यात आले.
कवठा येथील पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजना करा!
बाळापूर तालुक्यातील उठा या गावात पिण्यायोग्य पाण्याचे स्रोत उपलब्ध नाही आणि या गावाला नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने गावातील पाणीटंचाई निवारणासाठी सुनावणी घेऊन टंचाईअंतर्गत या गावात पुरवठ्याची उपाययोजना तातडीने करण्याची मागणी समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे यांनी सभेत केली.