"एकच मिशन जुनी पेन्शन "च्या निनादात कर्मचाऱ्यांचा थाळीनाद !
By संतोष येलकर | Published: March 20, 2023 06:08 PM2023-03-20T18:08:56+5:302023-03-20T18:43:08+5:30
‘"एकच मिशन जुनी पेन्शन " ’ च्या निनादात थाळीनाद आंदोलन करुन मागणीकडे शासनाचे वेधले.
अकोला: जूनी पेन्शन योजना लागू करण्याच्या करण्याच्या मागणीसाठी सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप सातव्या दिवशीही सुरुच होता. संपात सहभागी जिल्हयातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘"एकच मिशन जुनी पेन्शन " ’ च्या निनादात थाळीनाद आंदोलन करुन मागणीकडे शासनाचे वेधले. गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपाने जिल्हयातील सरकारी निमसरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला असून, कामकाज ठप्पच असल्याचे चित्र आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करीत राज्यातील सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील सर्वच सरकारी, निमसरकारी कर्मचारी संघटना सहभागी झाल्या असून, संपात सहभागी कर्मचारी संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, निदर्शने केली जात आहेत. त्यामध्ये संपाच्या सातव्या दिवशी २० मार्च रोजी संपात सहभागी कर्मचारी संघटनांच्यावतीने थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
‘एकच मिशन जूनी पेन्शन’ च्या निनादात थाळीनाद आंदोलन करीत आंदोलक कर्मचाऱ्यांनी मागणीकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधले. डफडे, थाळी वाजवून ‘एकच मिशन जूनी पेन्शन’ अशी नारेबाजी करीत आंदोलन करण्यात आले. या थाळीनाद आंदोलनात विविध कर्मचारी संघटनांच्या जिल्हा समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हयातील सरकारी निमसरकरी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे जिल्हयात सरकारी व निमसरकारी कार्यालयांमधील कामकाज ठप्प झाले असून, कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरल्याचे चित्र आहे.
डफडे, थाळीनादने दणाणला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर !
कर्मचारी संपाच्या सातव्या दिवशी सोमवारी संपात सहभागी जिल्हयातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केले. आंदोलक कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी आणि
डफडे व थाळी वाजवून ‘एकच मिशन जूनी पेन्शन’ अशी नारेबाजी करण्यात आली. कर्मचाऱ्यांचा थाळीनाद आणि नारेबाजीने दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला होता.
कामकाज ठप्प; सर्वसामान्यांना फटका
कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपात जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद, महानगरपालिका, तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये, भूमी अभिलेख विभाग, आरोग्य विभाग, सहजिल्हा निबंधक कार्यालय आदी जिल्ह्यातील सर्वच कार्यालयांतील कर्मचारी संपात सहभागी झाले. त्यामुळे जिल्हयातील सरकारी व निमसरकारी कार्यालयांमधील कामकाज ठप्प झाले आहे. कामे होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना या संपाचा नाहक फटका सहन करावा लागत आहे.