बारावीच्या परीक्षेत अकोल्यात यंदाही मुलीच हुश्शार! अकोला जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.०२ टक्के
By नितिन गव्हाळे | Published: May 21, 2024 02:53 PM2024-05-21T14:53:48+5:302024-05-21T14:53:56+5:30
मुलींची टक्केवारी ९४.८३ टक्के जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा सरस आहे.
अकोला : राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीचा निकाल २१ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या परीक्षेच्या निकालामध्ये जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलीच वरचढ ठरल्या आहेत. अकोला जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.०२ टक्के लागला असून, यात मुलींच्या टक्केवारीत गतवर्षीच्या ९४.७० टक्क्यांच्या तुलनेत ९४.८३ टक्के किंचित वाढ झाली आहे.
जिल्ह्यात बारावी परीक्षेसाठी १३ हजार ८७९ मुले, १२ हजार ८६ मुली अशा एकूण २५ हजार ९६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ हजार ८२६ मुले व १२ हजार २५ मुली अशा एकूण २५ हजार ८५१ विद्यार्थ्यांनी ८७ केंद्रांवरून परीक्षा दिली हाेती. एकंदरीतच बारावी परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल घवघवीत लागला आहे. या निकालामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींनी अपेक्षेनुसार यंदाही आघाडी मिळविली आहे.
जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा सरस आहे. बारावीच्या परीक्षेत १२ हजार ४२० मुले, तर ११ हजार ३६९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा दरवर्षीप्रमाणे भरघोस निकाल लागला असून, विज्ञान शाखेचे ९७.६४ टक्के विद्यार्थी पास झाले. त्या खालोखाल वाणिज्य शाखेचा ९३.३३ टक्के, कला शाखेचा निकाल ८७.६८ टक्के, तर व्होकेशनल शाखेचा निकाल ८०.४०२ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांचा निकाल उत्कृष्ट लागला असून, गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
असा लागला निकाल
तालुका मुले मुली टक्केवारी
अकोला ४४७४ ४७५३ ८९.६१
अकोट १४६७ १४५० ९०.५६
तेल्हारा ८९० ८७० ९४.७२
बार्शीटाकळी १६४८ ११७७ ९३.६०
बाळापूर १३५९ १२१० ९४.८३
पातूर १५३२ १०५७ ९५.११
मूर्तिजापूर १०५० ८५२ ९३.८३