विदर्भात अकोला सर्वाधिक हॉट, पारा ४५.५ अशांवर; यंदाच्या उन्हाळ्यातील
By Atul.jaiswal | Published: May 23, 2024 07:05 PM2024-05-23T19:05:39+5:302024-05-23T19:05:47+5:30
तप्त झळांनी अकोलेकर त्रस्त.
अकोला: मे महिन्याच्या उत्तरार्धात सूर्याने अक्षरश: आग ओकण्यास सुरुवात केली असून, यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद गुरुवारी (२३ मे) झाली. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी अकोल्याचे कमाल तापमान ४५.५ अंश सेल्सियस नोंदविले गेले असून, विदर्भात अकोला शहर सर्वाधिक उष्ण ठरले.
या वर्षी मार्च महिन्यापासूनच उन्हाळ्याच्या झळा जाणवण्यास सुरुवात झाली. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे एप्रिल व मे महिन्यात काही दिवस उन्हाळा सुसह्य झाला. मे महिन्याचे शेवटचे दिवस मात्र अकोलेकरांची परीक्षा पाहणार ठरत आहेत. रविवार, १९ मे पासून तापमानाचा ग्राफ चढण्यास सुरुवात झाली. बुधवार, २२ मे रोजी पारा ४४.८ अशांवर गेला. आगामी काही दिवसांत तापमान ४५ अंशावर जाण्याचे भाकित भारतीय हवामान खात्याच्या नागपूर वेधशाळेने वर्तवले होते. हा अंदाज गुरुवारी प्रत्यक्षात उतरला. पारा ४५.५ अशांवर गेल्यामुळे गुरुवारी दिवसभर अकोलेकरांना तप्त झळांचा सामना करावा लागला. वैशाख वणव्यासारखी स्थिती असल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर दिवसभर शुकशुकाट पहावयास मिळाला.
विदर्भातील प्रमुख शहरांचे तापमान
- अकोला : ४५.५
- अमरावती : ४३.०२
- भंडारा : ४०.०२
- बुलढाणा : ४२.००
- ब्रह्मपूरी : ४३.०२
- चंद्रपूर : ४३.०२
- गडचिरोली : ४२.०६
- गोंदिया : ४०.०४
- नागपूर : ४१.०९
- वर्धा : ४३.०२
- वाशिम : ४२.००
- यवतमाळ : ४३.०५