अकोल्यात रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 04:02 PM2020-08-10T16:02:35+5:302020-08-10T16:02:56+5:30
रानभाज्यांचा महोत्सव प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे.
अकोला: राज्याचे कृषिमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून रानभाज्यांचा महोत्सव प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे. अकोला येथे सोमवार रोजी प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालयाच्या आवारात, आर.डी.जी.महिला काँलेजसमोर, नेहरु पार्कच्या बाजुला, मूर्तीजापूर रोड अकोला येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जेष्ठ साहित्यीक डॉ. विठ्ठल वाघ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, आत्माचे प्रकल्प उपसंचालक अजय कुलकर्णी, कृषी उपसंचालक अरुण वाघमारे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक ताराणीया, अकोला आत्मा समितीचे अध्यक्ष भरत काळमेघ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठाचे शास्त्रज्ञ डॉ. भारत गीते, तालुका कृषि अधिकारी दिनकर प्रधान तसेच आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विजय शेंगोकार, मंगेश झामरे, योगेश देशमुख, सचिन गायगोळ, वरुण दळवी, अर्चना पेठे, निशीका चोपडे यांची उपस्थिती होती. पावसाची रिपरिप सुरू झाली की रानभाज्याही बाजारात डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. प्रेमाने, निगुतीने या भाज्या बनवून खाल्ल्या जातात. पाऊस सुरु झाला की, या रानभाज्या रानोमाळी कोणत्याही मेहनतीशिवाय आपोआप उगवतात. वर्षातून एकदाच येणारा रानमेवा म्हणजे खऱ्या अर्थाने सेंद्रीय अन्न होय. कोणतंही खत किंवा कीटकनाशक नाही, कोणतीही लागवड नाही. अशा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाज्या म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे.त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांना रानभाज्या विषयी ओळख व माहिती व्हावी याकरीता कृषि विभागाच्या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी शेतकरी गटाच्या माध्यमातून रानभाज्यांचे विक्री सुद्धा करण्यात आली. रानभाज्यांची ओळख व संवर्धन यामध्ये आदिवासी बांधवांचे फार मोठे योगदान असल्यामुळे तसेच संयुक्त राष्ट्र महासंघामार्फत ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवामध्ये जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या सर्व रानभाज्या व रानफळांची वैशिष्ठे, गुणधर्म व आरोग्यासाठी उपयोग, संवर्धन पद्धती, भाजीची पाककृती (रेसिपी) याची सचित्र माहिती देण्यात आली. याद्वारे रानभाज्यांना ओळख मिळून त्यांची विक्रीव्यवस्था व उत्पादन साखळी निर्माण होईल. ग्राहकांना आरोग्यपुर्ण भाज्या उपलब्ध होण्यासोबतच शेतकऱ्यांना आर्थिक उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार असल्याचे विचार प्रगट करण्यात आले. यावेळी रानातील मेवा म्हणून, अंबाडी,चिवळी,केना,शेवगा, सुरण,करवंद,आघाडा.टरोटा,पिंपळ,भूई आवळा,करटोली, राजगुरा,वाघाटे,फांदीची भाजी,कुंजीर भाजी,चमकुराचे पाने,काटसावर,जिवतीचे फुलं व इतर प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी रास्त भावात उपलब्ध होती.