मनपा हद्दवाढीतील ग्रामीण अंगणवाडीसेविकांना शहर विभागाच्या सेवा ज्येष्ठता यादीत समाविष्ट करा !
By संतोष येलकर | Published: April 18, 2023 08:09 PM2023-04-18T20:09:31+5:302023-04-18T20:09:38+5:30
अंगणवाडीसेविकांची मागणी : जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
अकोला: अकोला महागनरपालिका हद्दवाढ क्षेत्रात समाविष्ट गावांतील ग्रामीण भागात कार्यरत अंगणवाडीसेविकांची नावे शहर विभागातील सेवा ज्येष्ठता यादीत समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी अंगणवाडीसेविकांनी मंगळवारी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली.
गेल्या २०१६ मध्ये अकोला महानगरपालिकेची हद्दवाढ करण्यात आली असून, शहरालगतची २४ गावे हद्दवाढीच्या क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली. मनपा हद्दवाढ क्षेत्रात समाविष्ट गावांमध्ये कार्यरत अंगवाडीसेविका अद्यापही बाल विकास प्रकल्प ग्रामीण अकोला अंतर्गत कार्यरत आहेत. एप्रिल २०२३ नंतर शहर विभागात काम करावे लागणार असल्याच्या मौखिक सूचना संबंधित अंगणवाडीसेविकांना देण्यात आल्या.
त्यानुसार मनपा हद्दवाढ क्षेत्रातील ग्रामीण अंगणवाडीसेविकांनी शहर विभागात काम करण्याचे मान्य केले असले तरी, संबंधित ग्रामीण अंगणवाडी सेविकांची नावे शहर विभागाच्या सेवा ज्येष्ठता यादीत समाविष्ट करण्यात यावी तसेच पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शहर विभागात समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी मनपा हद्दवाढीत समाविष्ट कार्यरत ग्रामीण अंगणवाडीसेविकांनी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसाळे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी शितल अकरते, आशा बारसकर, उषा गोपानारायण, सुजाता गवइ, सोनल खेडकर, चारुशिला जोशी, मंगला मालोकार, आरसीया सैयद, सविता पवित्रकार, निलीमा ढाेले, छाया घोडे, ममता तुपलोंडे, शालीनी खंडारे आदी अंगणवाडीसेविका उपस्थित होत्या.