अभ्यासक्रमात कवितेचा समावेश; लेखकाला वर्षभरानंतर कळली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:43 PM2019-08-05T12:43:18+5:302019-08-05T12:44:02+5:30
अकोल्यातील एका कवीने ‘हायकू विद्ये’नुसार लिहिलेली कविता इयत्ता दहावीच्या हिंदी विषयाच्या लोकवाणी पुस्तकामध्ये परस्पर समाविष्ट केल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
अकोला: अभ्याक्रमामध्ये कथा, कवितांचा समावेश करण्यापूर्वी राज्य अभ्यास मंडळाने संबंधित लेखक, कवीला सूचित करून त्यांची परवानगी घेऊनच कथा, कविता प्रकाशित करायला हवी; परंतु राज्य अभ्यास मंडळाने अकोल्यातील एका कवीने ‘हायकू विद्ये’नुसार लिहिलेली कविता इयत्ता दहावीच्या हिंदी विषयाच्या लोकवाणी पुस्तकामध्ये परस्पर समाविष्ट केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, वर्षभरानंतर अकोल्यातील कवीला त्यांची कविता दहावीच्या हिंदी विषयाच्या पुस्तकामध्ये समाविष्ट केल्याचे समजले.
अकोल्यातील राम नगरात राहणारे हिंदी कवी अभिषेक ताराचंद जैन यांनी काही वर्षांपूर्वी हिंदीची अत्याधुनिक विद्या हायकूचा वापर करीत,‘ ऐसा भी होता है...’, ही कविता लिहिली. ती लोकप्रिय झाली. त्यामुळे सोशल मीडियावरही ती चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर एका पत्रिकेने ही कविता प्रसिद्ध केली. त्यांच्या काही ध्यानी मनी नसताना, चार दिवसांपूर्वी त्यांना ही कविता इयत्ता दहावीच्या हिंदी विषयाच्या लोकवाणी पुस्तकामध्ये त्यांच्या कवितेचा समावेश केला असल्याचे समजले. पुस्तकातील पान क्रमांक २२ वर त्यांची कविता प्रसिद्ध झाल्याचे पाहून, त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. राज्य अभ्यास मंडळाला कोणताही लेख, कविता प्रसिद्ध करण्यापूर्वी किंवा अभ्यासक्रमात समावेश करण्यापूर्वी संबधित लेखक, कवीची परवानगी घेणे आवश्यक आहे; परंतु राज्य मंडळाने कवी अभिषेक जैन यांची कोणतीही परवानगी न घेता, त्यांच्या परिचयासह परस्पर ही कविता हिंदीच्या लोकवाणी पुस्तकामध्ये प्रसिद्ध केली. विशेष म्हणजे, अभिषेक जैन हे कोठे राहणारे आहेत, त्यांचा परिचय काय आहे, हे जाणून न घेता, परस्पर त्यांची कविता प्रसिद्ध करून राज्य अभ्यास मंडळाने उतावळेपणा केला आहे. राज्य अभ्यास मंडळाच्या या प्रकारामुळे कविवर्य अभिषेक जैन हे खऱ्या सन्मानापासून, मानधनापासून वंचित राहिले आहेत. अभ्यास मंडळाने त्यांची माहिती काढून आणि त्यांना कविता समाविष्ट करीत असल्याची माहिती देऊन त्यांची कविता प्रसिद्ध केली असती तर अकोल्यातील या कवीचा खºया अर्थाने सन्मान झाला असता.
जैन यांनी कशी अवगत केली ‘हायकू विद्या’!
अभिषेक जैन खासगी नोकरी करतात. मूळचे ते झारखंड राज्यातील गिरीडीह येथील राहणारे आहेत. १२ वर्षांपूर्वी ते अकोल्यात आले. त्यांना कवी लेखनाचा छंद आहे. फेसबुकवर त्यांना हायकू विद्येबाबत वाचायला मिळाले. त्यांची रुची निर्माण झाल्यामुळे त्यांनी हायकू विद्या अवगत केली.
‘हायकू विद्ये’ला प्रथमच हिंदीत स्थान
हायकू ही जपानी विद्या आहे. तिचा हिंदी भाषेतही आता वापर होत आहे. राज्य अभ्यास मंडळ पुणे यांनी इयत्ता दहावीच्या हिंदी विषयामध्ये हायकू विद्येला प्रथमच स्थान दिले असल्याची माहिती कवी अभिषेक जैन यांनी दिली.
कथा, कविता प्रकाशित करण्यापूर्वी संबंधित लेखकाची परवानगी घेण्यात येते; परंतु अभिषेक जैन यांची माहिती मिळाली नसल्यामुळे आणि त्यांची हायकू विद्येतील कविता दर्जेदार असल्यामुळेच अत्यंत विचारपूर्वक राज्य अभ्यास मंडळाने कवितेचा अभ्यासक्रमात समावेश केला.
-प्रा. शारदा बियाणी, सदस्य,
राज्य अभ्यास मंडळ
(हिंदी विषय)