दिव्यांग प्रमाणपत्र वितरणात जाचक अटींचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:44 AM2017-07-31T02:44:18+5:302017-07-31T02:44:22+5:30
अकोला : दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी असलेल्या जाचक अटींमुळे हे प्रमाणपत्रे देण्याचे काम मात्र अत्यंत धिम्या गतीने होत असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी असलेल्या जाचक अटींमुळे हे प्रमाणपत्रे देण्याचे काम मात्र अत्यंत धिम्या गतीने होत असल्याचे दिसून येत आहे. १ मे २०१७ ते ३० जुलै २०१७ या कालावधीत दिव्यांग प्रमाणपत्रांसाठी अर्ज केलेल्या अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील २२७८ व्यक्तींपैकी केवळ १३०१ दिव्यांगांनाच हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून त्यांना विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. या सोयी-सुविधांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले दिव्यांग प्रमाणपत्र मिळविणे मात्र कठीण होऊन बसले आहे. विविध प्रकारचे दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना शासनाकडून दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र जारी केल्या जाते. यासाठी संबंधित व्यक्तीला जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रीतसर अर्ज करावा लागतो. शारीरिक दिव्यांगत्व, दृष्टिदोष, कर्णबधिर, मानसिकदृष्ट्या असामान्य असलेल्यांना विविध तपासण्यानंतर हे प्रमाणपत्र जारी केले जाते. यासाठी दिव्यांगत्वाची टक्केवारी किमान ४० असावी लागते. यासाठी हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दररोज अनेकजण जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अर्ज दाखल करतात. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाकडून विविध वर्गवारीनुसार दिव्यांग प्रमाणपत्र जारी करण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील २२७८ दिव्यांग बांधवांनी १ मे २०१७ ते ३० जुलै २०१७ या कालावधीत दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी १३०१ जणांना हे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले, तर ३०२ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले असून, ६७५ जणांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे. जाचक अटींमुळे प्रमाणपत्र वितरणाची गती मंदावल्याचे चित्र आहे.