‘इन्कोव्हॅक’ : ज्येष्ठांची लसीकरणाकडे पाठ, आता आरोग्य कर्मचाऱ्यांना देणार लस

By प्रवीण खेते | Updated: June 23, 2023 16:13 IST2023-06-23T16:12:24+5:302023-06-23T16:13:29+5:30

कोविडचा प्रादुर्भाव नसल्याने लस कोणी घेईना

'Incovac': Seniors turn their backs on vaccination, now the vaccine will be given to health workers | ‘इन्कोव्हॅक’ : ज्येष्ठांची लसीकरणाकडे पाठ, आता आरोग्य कर्मचाऱ्यांना देणार लस

‘इन्कोव्हॅक’ : ज्येष्ठांची लसीकरणाकडे पाठ, आता आरोग्य कर्मचाऱ्यांना देणार लस

अकोला : सध्या जिल्ह्यात कोविडची स्थिती पूर्णत: नियंत्रणात असली, तरी मध्यंतरी राज्यभरात कोविड रुग्णसंख्या वाढीस सुरुवात झाली होती. कोविडचा संभाव्य धोका लक्षात घेता शासनामार्फत नाकावाटे घेतली जाणारी ‘इन्कोव्हॅक’ लस जिल्हास्तरावर उपलब्ध करून देण्यात आली होती. शासनाच्या निर्देशांनुसार ही लस ज्येष्ठांसाठी प्रिकॉशन म्हणून देण्यात येणार होती. मात्र, ज्येष्ठांनी या लसीकरणाकडे पाठ फिरविली. त्यामुळे आता ही लस आरोग्य कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाइन वर्कर्सना दिली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

जिल्ह्यातील कोविडची स्थिती नियंत्रणात आल्याचे दिसून येते. मात्र, कोविडचा संभाव्य धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणेमार्फत सतर्कता म्हणून पुन्हा लसीकरणावर भर दिला जात आहे. त्याअनुषंगाने शासनामार्फत नाकावाटे दिल्या जाणाऱ्या ‘इन्कोव्हॅक’ लसीचा साठा आरोग्य यंत्रणेला पुरविला होता. प्रिकॉशन म्हणून ज्येष्ठांना बुस्टर डोस देण्याचे नियोजन होते. जिल्ह्यात लसींचा साठा उपलब्ध होताच महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, यंदा नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविल्याने मिळालेली लस आहे तशीच पडून असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात लस उपलब्ध झाल्यापासून आतापर्यंत एकाही लाभार्थीने लस घेतली नसल्याचे चित्र दिसून येते.

जिल्ह्यात किती आहे लसीचा साठा?
जिल्ह्याला मिळाले - ५०० डोस
महापालिका क्षेत्रासाठी - २०० डोस
ग्रामीण क्षेत्रासाठी - ३०० डोस

ग्रामीण भागात तालुकास्तरावरच लसीकरण

लसीचा मर्यादित साठा उपलब्ध असल्याने मोजक्याच केंद्रांवर लसीकरण सुरू केले जाणार आहे. ग्रामीण भागात केवळ तालुकास्तरावरच ही मोहीम राहणार असून, लाभार्थींना ग्रामीण रुग्णालयात ही लस उपलब्ध होणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

Web Title: 'Incovac': Seniors turn their backs on vaccination, now the vaccine will be given to health workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.