जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ; एक हजार मुलांमागे ९७२ जन्म !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:22 AM2021-09-22T04:22:26+5:302021-09-22T04:22:26+5:30

अकोला : जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ झाली असून, ऑगस्ट २०२१ अखेर १ हजार मुलांमागे ९७२ मुलींच्या जन्मदराचे ...

Increase in the birth rate of girls in the district; 972 births for a thousand children! | जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ; एक हजार मुलांमागे ९७२ जन्म !

जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ; एक हजार मुलांमागे ९७२ जन्म !

Next

अकोला : जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ झाली असून, ऑगस्ट २०२१ अखेर १ हजार मुलांमागे ९७२ मुलींच्या जन्मदराचे प्रमाण आहे. २०१६-१७ मध्ये हे प्रमाण १ हजार मुलांमागे ९०५ मुली इतके होते, अशी माहिती गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे (लिंगनिवडीस प्रतिबंध) कायदा अर्थात ‘पीसीपीएनडीटी’ अंमलबजावणी संदर्भात जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीत मंगळवारी देण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वंदना पटोकार वसो, जिल्हा स्त्रीरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त वि. द. सुलोचने, डॉ. सुनील मानकर, डॉ. स्वप्निल माहोरे, डॉ. मीनल पवार, डॉ. अस्मिता पाठक, डॉ. मीना शिवाल, डॉ. व्ही. टी. सोनोने, डॉ. श्वेता वानखडे, डॉ. सैय्यद इशरत, ॲड. शुभांगी ठाकरे तसेच समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासकीय ५ आणि खासगी २२ अशी २७ सोनोग्राफी चाचणी केंद्र आहेत; तर महापालिका हद्दीत शासकीय ४ आणि खासगी १०६ अशी एकूण ११० सोनोग्राफी चाचणी केंद्रे आहेत. जिल्ह्यात कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत असल्यामुळे दर एक हजार मुलांमागे मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

गेल्या सहा वर्षातील मुलींच्या

जन्मदराचे असे आहे प्रमाण !

वर्ष जन्मदर

२०१६...१७ ९०५

२०१७...१८ ९११

२०१८...१९ ९२४

२०१९...२० ९५६

२०२०...२१ ९५९

२०२१...२२ (ऑगस्ट) ९७२

.............................................................

मुलींच्या जन्माचे स्वागत करताना

लिंगनिदानाचे प्रकार थांबवा !

मुलींच्या जन्माचे स्वागत करतानाच होत असलेल्या गर्भावस्थेतील बालकांच्या लिंगनिदानाचे प्रकार थांबविण्यासाठी समाजात जनजागृतीसाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांचा सहभाग घ्यावा. तसेच मिळालेल्या खबरींच्या आधारे समितीमार्फत सोनोग्राफी सेंटर्सची आकस्मिक तपासणी करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी बैठकीत दिले.

Web Title: Increase in the birth rate of girls in the district; 972 births for a thousand children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.