रक्तदानात महिलांची टक्केवारी वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2016 01:27 AM2016-04-13T01:27:24+5:302016-04-13T01:27:24+5:30
२४ हजारांवर महिलांचे रक्तदान; युवकांचे प्रमाणही समाधानकारक.
नितीन गव्हाळे /अकोला
प्रत्येक क्षेत्रातच महिला पुरुषांच्या बरोबरीने आघाडीवर आहेत. रक्तदानासारख्या पुण्यकार्यातही त्या मागे नाहीत. गत पाच वर्षांच्या रक्तदानाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, अकोल्यात २४ हजार ६८0 महिलांनी रक्तदान करून पुरुषांच्या तुलनेत आम्हीही मागे नसल्याचे दाखवून दिले आहे. रक्तदानामध्ये युवकांचेही प्रमाण समाधानकारक असून, दरवर्षी युवकांच्या रक्तदानातही वाढ झाल्याचा शुभसंकेत आकडेवारीवरून दिसून येतो.
महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता, बदलती जीवनशैली, कमी आणि असंतुलित आहार यामुळे महिलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे इच्छा असून महिला रक्तदान करू शकत नाहीत; परंतु गत पाच वर्षांमध्ये महिलांच्या रक्तदान करण्याच्या प्रमाणात बर्याच अंशी चांगली वाढ झाली आहे.
गत पाच वर्षांमध्ये शहरातील रक्तपेढय़ांमध्ये एकूण १ लाख ५ हजार ३९ जणांनी रक्तदान केले. यात महिलांचे मोठे योगदान दिले. गत काही वर्षांमध्ये महिलांच्या रक्तदानात नेत्रदीपक वाढ झाली आहे. २0१४ व २0१५ या दोन वर्षांत महिलांचा रक्तदानाच्या पवित्र कार्यात सहभाग वाढल्याचे दिसून आले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला रक्तदात्यांची संख्या कमी असली तरी, त्यांची शारीरिक क्षमता व हिमोग्लोबिनची कमतरता लक्षात घेता, एवढय़ा महिलांना रक्तदानासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.