अतिसारच्या रुग्णांमध्ये वाढ : दूषित पाण्यामुळे वाढला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:15 PM2019-08-06T12:15:49+5:302019-08-06T12:16:05+5:30

आठवड्याभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात अतिसार व गॅस्ट्रोच्या रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

Increase in diarrhea patients: Increased risk due to contaminated water | अतिसारच्या रुग्णांमध्ये वाढ : दूषित पाण्यामुळे वाढला धोका

अतिसारच्या रुग्णांमध्ये वाढ : दूषित पाण्यामुळे वाढला धोका

Next

अकोला : गत आठवड्यापासून जिल्ह्यात दमदार संततधार पावसाने हजेरी लावली. या कालावधीत पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाल्याने जलजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आठवड्याभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात अतिसार व गॅस्ट्रोच्या रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
पावसाळ्यात सूर्यप्रकाशाचा अभाव व थंड हवामानामुळे वातावरणात रोगजंतुचा प्रादूर्भाव वाढतो. सर्वत्र घाण साचल्याने भूमिगत जलस्रोत दूषित होतात, तसेच साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्तीही वाढीस लागते. गत आठवड्याभरापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रोगजंतूंसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने विविध आजारांनी डोके वर काढले आहे. गत आठवड्याभरात सर्वोपचार रुग्णालयात ५० पेक्षा जास्त अतिसार व गॅस्ट्रोच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दूषित पाणी पिण्यात आल्याने पोटांच्या विकारात वाढ झाली असून, जुलाब, हगवण अशी लक्षणे असलेले रुग्ण घराघरांमध्ये आहेत; तसेच ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशी लक्षणेही रुग्णांमध्ये आढळून येत आहेत. असे रुग्णही दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल होत असून, सर्वोपचार रुग्णालयासह खासगी दवाखाने रुग्णांनी फुल्ल झाल्याचे चित्र आहे.

ओपीडी फुल्ल; डॉक्टरांची वानवा
पावसाळ्यात विविध आजारांनी डोके वर काढल्यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. त्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने उपलब्ध डॉक्टरांवर ताण येत आहे. सर्वोपचारमध्ये दररोज साधारणपणे दोन हजार रुग्ण उपचारासाठी येतात; परंतु गत आठवडाभरात हा आकडा चार हजाराच्या घरात गेला आहे.

दूषित पाणी आणि माशांमुळे धोका
दूषित पाणी पिण्यात आल्याने पोटाचे विकार संभवतात. खाद्य पदार्थांवर बसणाऱ्या माशांमुळेही पोटाच्या विकारांचा जास्त धोका उद््भवतो. त्यामुळे घरात स्वच्छता पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.

अशी घ्या काळजी

  • उघड्यावरील खाद्य पदार्थ खाणे टाळा
  • पाणी उकडूनच प्यावे
  • घरातील परिसर कोरडा ठेवावा
  • माशांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी स्वच्छता राखा
  • लक्षणे आढळताच डॉक्टरांना दाखवा

 

पावसाळ्यात वातावरणात ओलावा असल्याने रोगजंतुंना तो पोषक ठरतो. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पाणी उकडून पिणे, उघड्यावरील पदार्थ न खाणे, स्वच्छता बाळगणे अशा प्रकारची खबरदारी घेतल्यास आजारांपासून बचाव करता येतो. आजारी पडल्यास आरोग्य केंद्रामध्ये जाऊन उपचार करून घ्यावे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

Web Title: Increase in diarrhea patients: Increased risk due to contaminated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.