अकोला जिल्ह्यात शासकीय दूध संकलनात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 06:48 PM2021-05-08T18:48:54+5:302021-05-08T18:49:15+5:30
Akola News : दररोज २३००-२५०० लिटर दुधाचे संकलन होत आहे.
अकोला : संचारबंदीमुळे जिल्ह्यातील हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करणारे व्यवसाय बंद आहेत. परिणामी, दुधाची उचल बंद आहे. त्यामुळे दूध व्यावसायिक शासकीय दुग्ध योजनेला दुधाचा पुरवठा करत आहेत. त्यामुळे शासकीय दुग्ध योजनेच्या संकलनात वाढ नोंदविण्यात आली असून दररोज २३००-२५०० लिटर दुधाचे संकलन होत आहे.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात दूध व्यावसायिकांना मुभा देण्यात आली आहे; परंतु जिल्ह्यातील हॉटेल, दुग्धजन्य पदार्थ निर्माण करणारी दुकाने बंद आहेत. प्रतिबंधात्मक आदेशामुळे बाहेर फिरण्यावर देखील निर्बंध असल्याने चहा व्यावसायिकांनी देखील व्यवसाय बंद ठेवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे दुधाची मागणी घटली आहे. परिणामी, दररोज संकलित होणाऱ्या दुधाचे करावे तरी काय? असा प्रश्न दुग्ध व्यावसायिकांसमोर निर्माण झाला होता. त्यामुळे शिल्लक दुधाचा पुरवठा शासकीय दुग्ध योजनेला केला जात आहे.
शासकीय दुग्ध योजनेला संचारबंदीआधी १४०० लिटर दररोजची आवक होती. फेब्रुवारी महिन्यात शासकीय दूध योजनेला होणारा पुरवठा कमी झाला. आता मे महिन्यात मात्र शासकीय दुग्ध योजनेला होणारी आवक वाढली आहे. ती सरासरी २३०० लिटरवर पोहोचल्याची माहिती जिल्हा दुग्ध विकास अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. त्यानंतर ते दूध जिल्हा दुग्ध विकास कार्यालयाला पाठविण्यात येते. हे दूध अमरावती येथे पाठविण्यात येते. दूध पावडर निर्मिती करिता दूध भंडारा जिल्हा शासकीय दुग्ध उत्पादन संघाकडे पाठविण्यात येत असल्याची माहिती देखील देण्यात आली.
संचारबंदीत मार्केटमध्ये दुग्ध उत्पादकांचे दूध कमी विकले गेल्यास ते दूध संस्थांमार्फत स्वीकृत करण्यात येईल.
- रितेश मते, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, अकोला
संचारबंदीआधी संकलन
१४००
संचारबंदीनंतर संकलन
२३००
येथून सर्वाधिक दूध संकलन
अकोट १२००, मूर्तिजापूर तालुक्यातून १००० लिटर दूध संकलन होत आहे. तसेच बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथूनही दुधाचे संकलन करण्यात येत आहे.