पेन्शन-मानधनात वाढ, जातनिहाय जनगणना करा!

By संतोष येलकर | Published: July 18, 2024 03:42 PM2024-07-18T15:42:00+5:302024-07-18T15:42:44+5:30

अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Increase in pension-emoluments, caste-wise census! | पेन्शन-मानधनात वाढ, जातनिहाय जनगणना करा!

पेन्शन-मानधनात वाढ, जातनिहाय जनगणना करा!

अकोला: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन, मानधनात वाढ करण्यासह जातनिहाय जनगणना करण्यात यावी आदी मागण्यांसाठी एल्गार पुकारित अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन व लालबावटा युनियनच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व मानधनात वाढ करण्यात यावी व इतर प्रलंबित प्रश्न तातडीने निकालात काढण्यात यावे तसेच जातनिहाय जनगणना करण्यात यावी व आरक्षणाची ५० टक्के मर्यादा उठविण्यात यावी आदी मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आणि लाल बावटा युनियन अकोला जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान व राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. या आंदोलनात अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा कार्याध्यक्ष रमेश गायकवाड, जिल्हाध्यक्ष सुनिता पाटील, जिल्हा सचिव नयन गायकवाड, सुरेखा ठोसर, दुर्गा देशमुख, सरोज मूर्तिजापूरकर, ज्योती ताथोड, महानंदा ढोक, सुनंदा पद्मने, आशा मदने, मंगला अढाऊ, त्रिवेणी मानवटकर, कल्पना महल्ले, वंदना डांगे, मंगला मांजरे यांच्यासह जिल्हयातील अंगणवाडीसेविका, मतदनीस कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.

‘लाडकी बहीण ’योजनेचे
कामही करणार नाही !

अंगणवाडी कर्मचारी फक्त अंगणवाडीतील मुलांना शिक्षण व आहार वितरण आणि आरोग्यविषयक कामे करणार असून, जोपर्यत शासन व प्रशासनाकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात तोडगा काढण्यात येत नाही, तोपर्यंत अंगवाडी कर्मचारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कामही करणार नाहीत. तसेच संंबंधित सर्व योजनांचे काम बंद करुन, मासिक अहवाल, शासकीय बैठका व योजनांच्या कामावर बहिष्कार घालण्यात येत असल्याचेही युनियनच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आंदोलकांच्या घोषणांनी
दणाणला परिसर!

अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या निदर्शने आंदोलनादरम्यान विविध मागण्यांसंदर्भात आंदोलकांनी दिलेल्या विविध घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय चौक परिसर दणाणून गेला होता.

Web Title: Increase in pension-emoluments, caste-wise census!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.