कोविड चाचणी केंद्रांची संख्या वाढवा-भरगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:18 AM2021-03-06T04:18:33+5:302021-03-06T04:18:33+5:30
अकोला : जिल्हा प्रशासनाने शहरातील व्यापाऱ्यांना व्यावसायिक प्रतिष्ठाने सकाळी ९ ते सायंकाळी पाचपर्यंत उघडण्याची परवानगी दिली. त्यासाठी दुकानदार व ...
अकोला : जिल्हा प्रशासनाने शहरातील व्यापाऱ्यांना व्यावसायिक प्रतिष्ठाने सकाळी ९ ते सायंकाळी पाचपर्यंत उघडण्याची परवानगी दिली. त्यासाठी दुकानदार व दुकानातील कामगारांना कोविड चाचणीची अट बंधनकारक केली आहे. त्यापूर्वी प्रशासनाने चाचणी केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी माजी महापौर मदन भरगड यांनी केली आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याची वस्तुस्थिती आहे. त्याला अटकाव घालण्यासाठी जिल्हा व मनपा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्यामध्ये आततायीपणा दिसून येत आहे. शुक्रवारी सकाळी दुकाने खुली करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात मनपा, महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकांनी कारवाईचा बडगा उगारला.
सद्यस्थितीत शहरात २५ हजार दुकाने आहेत. प्रत्येक दुकानात सरासरी ३ कामगार आहेत. म्हणजे ७५ हजार व्यावसायिक व कामगारांच्या कोरोना चाचण्या करण्यासाठी किमान १ महिना लागणार आहे. शहरात चाचणी करण्यासाठी केवळ १० केंद्र सुरू आहेत. प्रत्येक चाचणी केंद्रावर दररोज फक्त २०० ते ३०० चाचणी होऊ शकतात. त्यामुळे कोविड चाचणीसाठी शहरात केंद्रांची संख्या वाढवावी अशी मागणी माजी महापौर मदन भरगड यांनी केली आहे. जोपर्यंत चाचणी केंद्र वाढविण्यात येत नाही तोपर्यंत महापालिकेने दुकान सील करण्याची कारवाई थांबवावी अशी मागणी भरगड यांनी केली आहे.