रेल्वे क्वाॅर्टर परिसरात पाेलीस गस्त वाढवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:14 AM2021-07-08T04:14:18+5:302021-07-08T04:14:18+5:30
जिल्हा कचेरीत नियम पायदळी अकाेला : काेराेनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे ...
जिल्हा कचेरीत नियम पायदळी
अकाेला : काेराेनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांसह खुद्द काही अधिकारी व कर्मचारी काेराेना नियम पायदळी तुडवित असल्याचे पाहावयास मिळत आहे. जिल्हा प्रशासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना समज देण्याची मागणी हाेत आहे.
जिल्हा परिषदेत स्वच्छतागृहाचा अभाव
अकाेला : जिल्हा परिषदेच्या विविध विभागात प्रलंबित कामे निकाली काढण्याच्या उद्देशातून ग्रामीण भागातील नागरिक दाखल हाेतात. यामध्ये महिला व पुरुषांचा समावेश राहताे. जिल्हा परिषदेच्या आवारात महिलांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह नसल्यामुळे महिलांची कुचंबणा हाेत आहे. या विषयाकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
माेकाट कुत्र्यांचा बंदाेबस्त करा!
अकाेला : शहरात माेकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून त्यांचा सुळसुळाट झाला आहे. जुने शहरातील भांडपुरा चाैक, गुलजारपुरा चाैक, दगडी पूल, कमला वाशिम बायपास चाैक, उमरी, माेहम्मद अली चाैकातील मच्छी मार्केट आदी उघड्यावर मांसविक्रीच्या ठिकाणी माेकाट कुत्र्यांच्या झुंडी आढळून येतात. अशा भटक्या कुत्र्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी प्रभाग ४ मधील उमरीवासीयांनी केली आहे.
जठारपेठ चाैकात रस्त्यावर सांडपाणी
अकाेला : जठारपेठ चाैक ते उमरी मार्गावरील मुख्य नाली बुजविण्यात आल्यामुळे परिसरातील हाॅस्पिटल, इमारतींमधील सांडपाणी रस्त्यात साचत असल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक ४ व ५ मधील नगरसेवकांसह मनपाच्या आराेग्य निरीक्षकांचे या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आराेप स्थानिक रहिवासी करीत आहेत.
लसीकरणासाठी पुढाकार घ्या!
अकाेला : काेराेनाच्या संसर्गाला आळा बसावा या उद्देशातून नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे समाेर येताच नागरिकांनीदेखील लसीकरण केंद्रांकडे पाठ फिरवल्याचे समाेर आले आहे. काेराेना विषाणू अद्यापही कायम असल्याने लसीकरण माेहिमेसाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन मनपाच्यावतीने करण्यात येत आहे.
पथकांचे रेस्टाॅरंटकडे दुर्लक्ष
अकाेला : जिल्हा प्रशासनाने सकाळी ९ ते सायंकाळी ४ या कालावधीत दुकाने खुली करण्याची परवानगी दिली. तसेच हाॅटेल, रेस्टाॅरंट, खानावळी चालकांना पार्सल सुविधा देण्याचे निर्देश आहेत. तरीही काही खानावळी, रेस्टाॅरंटमध्ये नियम बाजूला सारत आतमध्ये ग्राहकांना जेवण दिले जात आहे. याकडे मनपासह महसूल प्रशासनाने गठीत केलेल्या पथकांचे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसत आहे.