गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ; शांततेला सुरूंग
By admin | Published: December 5, 2014 11:59 PM2014-12-05T23:59:40+5:302014-12-05T23:59:40+5:30
अमरावती विभागात यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद.
अजय डांगे/ अकोला
राज्यातील शांततेला सुरुंग लागला असून, गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे गत वर्षभरातील आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. २0१२ मध्ये खून, प्राणघातक हल्ला, अपहरण, दरोडा, जबरी चोरी, दंगल, बलात्कार यासारखे गुन्हे २६ हजार ६५0 घडले होते. याच गुन्ह्यांची नोंद सन २0१३ मध्ये ३२ हजार ५५२ एवढी झाली.
हिंसा ही समाजाला आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी बाब आहे. हिंसेच्या घटना घडल्यास सातत्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण होते. त्याचा परिणाम विकासावरही होतो. सन २0१२ मध्ये जनजीवनावर परिणाम करणार्या गंभीर गुन्ह्यांची संख्या ६ हजार ९६३, तर २0१३ मध्ये ८ हजार १0३ होती. सन २0१२ मध्ये सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहोचविणारे गुन्हे ७ हजार ७४२ , तर २0१३मध्ये १0 हजार ६७९ गुन्हे घडले. सार्वजनिक सुरक्षिततेवर परिणाम करणार्या दोन गटात मारहाणीसारख्या गुन्ह्यांत सन २0१२च्या तुलनेने २0१३मध्ये घट झाली आहे. २0१२मध्ये सार्वजनिक सुरक्षिततेवर परिणाम करणारे १0 हजार १0६ गुन्हे तर २0१३मध्ये १0 हजार ८0७ गुन्हे नोंदविण्यात आले.
अमरावती विभागात यवतमाळ अव्वल..
सन २0१३मध्ये अमरावती विभागात सर्वात जास्त यवतमाळ जिल्ह्यात गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले. सन २0१३मध्ये विभागात खून-२५६, प्राणघातक हल्ला-२८४, बलात्कार-३१0, अपहरण-२५३, लुटमार-३४८ आणि दरोड्याचे ५१ गुन्हे नोंदविण्यात आले.
जिल्हा खून खुनाचा प्रयत्न बलात्कार अपहरण दरोडा लुटमार
अकोला ३५ ४७ ४६ ३१ १७ ७९
अमरावती ५५ ६0 ७८ ५३ 0५ ४८
बुलडाणा ५४ ४३ ५६ २१ 0८ ४१
यवतमाळ ८५ ९१ १0४ १२४ १९ १४९
वाशिम २७ ४३ २६ २४ 0२ ३१
*पोलिस आयुक्तालयांचीही स्थिती गंभीरच
औरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पूणे, सोलापूर, ठाणे या पोलिस आयुक्तालय असलेल्या प्रमख महानगरांमध्ये २0१२च्या तुलनेत २0१३मध्ये सर्वच गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. २0१२ मध्ये या महानगरांमध्ये ७९ हजार १४८, तर २0१३मध्ये ८८ हजार ८२२ दखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. दोन वर्षात या गुन्ह्यांमध्ये १२.२२ टक्के वाढ झाली. खुनाचा प्रयत्न- ८.३१ टक्के, दरोडा-११.५६, लुटमार-५0.७0, चोरी-१.४५, दंगल-५.५४ आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये १४.४१ टक्के वाढ झाली. खुनाच्या गुन्ह्यामध्ये मात्र ७.१४ टक्क्यांनी घट झाली.