जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठय़ात वाढ
By admin | Published: August 6, 2015 01:18 AM2015-08-06T01:18:12+5:302015-08-06T01:18:12+5:30
काटेपूर्णा धरण १९ टक्के भरले; अकोलेकरांचे जलसंकट टळले.
अकोला: गेल्या २४ तासांत अतवृष्टी झाल्याने, बुधवारी जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठय़ांमध्ये वाढ झाली. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या महान येथील काटेपूर्णा धरणात सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत १९ टक्के जलसाठा उपलब्ध झाल्याने, दोन महिन्यात ओढवणारे शहरवासीयांचे जलसंकट टळले आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याच्या स्थितीत जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्या महान येथील काटेपूर्णा धरणात सोमवार, ३ ऑगस्टपर्यंत केवळ ६ टक्केच जलसाठा उपलब्ध होता. त्यामुळे शहरवासीयांसमोर जलसंकट उभे असतानाच, गेल्या २४ तासांत बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात अतवृष्टी झाली. अतवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठय़ातही वाढ झाली. बुधवारी सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंंत महान येथील काटेपर्णा धरणात १८.५७ टक्के जलसाठा उपलब्ध झाला. धरणातील जलसाठय़ात वाढ झाल्याने, दोन महिन्यात अकोलेकरांवर ओढवणारे जलसंकट तूर्त टळले आहे. तसेच मोर्णा धरणात २९.0८ टक्के, निगुर्णा धरणात २८.0७ टक्के, उमा धरणात २६.७५ टक्के, तर वान धरणात ६२.२५ टक्के जलसाठा उपलब्ध झाला.