दलितांवरील अत्याचारात वाढ;आरक्षणाला धोका - फौजीया खान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 02:59 PM2018-07-06T14:59:16+5:302018-07-06T16:22:32+5:30
अकोला: राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात दलितांवरील अत्याचारात वाढ झाली असून त्यांच्या आरक्षणाला धोका निर्माण झाल्याचे टिकास्त्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री श्रीमती फौजीया खान यांनी सोडले.
अकोला: राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात दलितांवरील अत्याचारात वाढ झाली असून त्यांच्या आरक्षणाला धोका निर्माण झाल्याचे टिकास्त्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री श्रीमती फौजीया खान यांनी सोडले. शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाच्यावतीने ‘संविधान बचाओ,देश बचाओ’ मोहिम देशभरात राबविल्या जाणार असल्याची माहिती दिली. भाजप सरकारच्या दडपशाहीमुळे देशात आणीबाणीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून स्वातंत्र्यांची दुसरी लढाई लढण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे फौजीया खान यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या दडपशाहीमुळे भारतीय संविधानाला धोका निर्माण झाला आहे. संविधानातील घटनात्मक तरतूदींना डावलून सर्वसामान्यांवर निर्बंध लादले जात आहेत. लोकशाहीचा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या ‘मिडीया’वर सरकारचा दबाव असल्यामुळे न्याय मागणाºयांची गळचेपी होत आहे. महिला,तरूणींवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ झाल्याचे चित्र आहे. सरकारच्या दडपशाहीला विरोध किंवा मत व्यक्त केल्यास संबंधितांची हत्या घडविल्या जात असल्याचे राकाँ महिला अध्यक्ष फौजीया खान यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश, कॉ.गोविंद पानसरे, कलबुर्गी,नरेंद्र दाभोलकर यांच्या दिवसाढवळ हत्या झाल्या. त्यांच्या मारेकºयांचा शोध घेण्यात तपास यंत्रणांची दमछाक होतेच कशी,असा सवाल फौजीया खान यांनी उपस्थित केला. एकूणच देशात असुरक्षिततेचे वातावरण असून सामाजिक सलोखा धोक्यात सापडला आहे. भाजप सरकारच्या धोरणांना विरोध करण्यासाठीच पक्षाच्यावतीने देशभरात ‘संविधान बचाओ, देश बचाओ’ मोहिम राबवली जात असल्याचे श्रीमती खान यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पुणे येथील माजी महापौर राजश्री भोसले, प्रदेश सरसचिटणीस मंदा देशमुख, महिला ग्रामीण अध्यक्ष पद्मा अहेरकर, जिल्हाध्यक्ष विजयराव देशमुख, राकाँचे प्रदेश सचिव श्रीकांत पिसे पाटील, महानगराध्यक्ष राजू मुलचंदानी, महिला महानगराध्यक्ष रिजवाना शेख अजीज, शहर कार्याध्यक्ष भारती निम आदि उपस्थित होते.
‘ईव्हीएम’,मनूस्मृतीची होळी!
पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे १७ जुले रोजी वसंतराव देशपांडे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान नागपूर येथे मनुस्मृती आणि ईव्हीएम मशीनची होळी केली जाणार आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे फौजिया खान यांनी स्पष्ट केले.