जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:22 AM2021-08-22T04:22:37+5:302021-08-22T04:22:37+5:30
रवी दामोदर अकोला : जिल्ह्यात पावसाने गत दोन दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ ...
रवी दामोदर
अकोला : जिल्ह्यात पावसाने गत दोन दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील महान येथील काटेपूर्णा धरणाचे दोन, तर तेल्हारा तालुक्यातील वान धरणाचे चार गेट उघडले असून, यामधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यात जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अतिवृष्टी, तर कुठे ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे नदी, नाले दुधडी भरून वाहू लागले होते. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक साठा जमा झाला होता. आता दोन ते तीन दिवसांपासून जिल्हाभरात दमदार पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ होत आहे. जिल्ह्यातील दोन मोठे, तर मध्यम चार प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढत आहे. दरम्यान, वाढता जलसाठा लक्षात घेऊन बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा धरणाचे दोन, तर तेल्हारा तालुक्यातील वान धरणाचे चार गेट उघडले असून, यामधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
----------------------------
जिल्ह्यातील प्रकल्पांत उपलब्ध जलसाठा (२१ ऑगस्ट सकाळपर्यंत)
काटेपूर्णा प्रकल्प ९२.३५ टक्के
वान प्रकल्प ७४.०६ टक्के
निर्गुणा ९५.५३ टक्के
मोर्णा ६४.६६ टक्के
उमा २८.२५ टक्के
----------------------------------------------
घुंगशी बॅरेजचे सर्व दरवाजे उघडे
मूर्तिजापूर तालुक्यातील नव्याने तयार करण्यात आलेल्या घुंगशी बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत पावसाचा जोर पाहता नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.