‘अंडवृद्धी’ आजाराचा वाढता धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 02:42 PM2019-12-10T14:42:34+5:302019-12-10T14:42:44+5:30
थमिक आरोग्य केंद्रस्तरावर राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात अकोल्यातील ११ रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अंडवृद्धी म्हणजेच ‘हायड्रोसील’ हा आजार नेहमीच दुर्लक्षित असल्याने या आजाराने ग्रस्त रुग्ण संख्या वाढत आहे. अनेकांना या आजाराविषयी माहिती नसल्याने त्याकडे रुग्णांकडूनही दुर्लक्षकेले जाते; पण अंडवृद्धीचा वाढता धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणेंतर्गत राज्यभरात अंडवृद्धीग्रस्त रुग्णांची विशेष शोध मोहीम राबविण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात अकोल्यातील ११ रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
वाढत्या वयासोबतच पुरुषांमध्ये आरोग्यविषयक अनेक समस्या उद््भवतात. या समस्यांपैकीच एक गंभीर समस्या ‘हायड्रोसील’ म्हणजेच अंडवृद्धी ही आहे. सर्वसाधारणत: या आजाराकडे रुग्ण दुर्लक्ष करत असल्याने अशा रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. या आजाराचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी केंद्र शासनाने धोरण आखले असून, त्यानुसार राज्यातील सर्वच अंडवृद्धी रुग्णांचे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने राज्यभरात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर अंडवृद्धी रुग्णांची शोध मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मोहिमेंतर्गत जिल्हा हिपताप अधिकारी कार्यालयांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर विशेष शोध मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात गोरेगाव व माझोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ११ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले.
काय आहे अंडवृद्धी आजार?
- ‘हायड्रोसील’ म्हणजेच अंडवृद्धी नावाचा आजार
- वयाची ४० वर्षे पूर्ण केल्यानंतर पुरुषांच्या ‘स्क्रोटम’ म्हणजेच अंडकोष पिशवीमध्ये हा आजार होतो.
- यामध्ये फ्लुइड भरलेले असते. एखाद्या कारणामुळे हे फ्लुइड टेस्टिकलच्या बाहेर जमा झाले, तर अंडवृद्धीची होण्याची शक्यता असते.
- परिणामी अंडकोष पिशवी मोठी होऊन यामध्ये तीव्र वेदना होतात.
ही आहेत आजाराची कारणे
- अंडकोषाला दुखापत होणे
- नसांमध्ये सुजन
- आनुवंशिक कारण
- भारी वजन उचलणे
- लघवी रोखण्याची सवय
अंडवृद्धी रुग्ण तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून, ही राज्यभरात प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत या आजाराने पीडित रुग्णांचा उपचार करण्यात येणार असून, आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रियादेखील करण्यात येणार आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यात मात्र अंडवृद्धीचे रुग्ण कमी असल्याने आजारावर लवकर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल.
- डॉ. विवेक पेंढारकर, जिल्हा हिवताप अधिकारी, अकोला