कोरोनानंतरचे साईड इफेक्ट्स वाढले, औषधं काळजीपूर्वक घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 09:48 AM2021-05-10T09:48:43+5:302021-05-10T09:51:24+5:30
Akola News : फंगल इन्फेक्शनसह इतर काही आजारांचा धोका वाढला आहे.
अकोला : मागील दोन महिन्यात कोविडच्या गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून, यामध्ये अनेक रुग्णांवर उपचारादरम्यान रेमडेसिविर आणि स्टेरॉईडचा वापर करण्यात आला, मात्र ज्या रुग्णांना मधुमेहाचा त्रास आहे, अशा काही रग्णांमध्ये फंगल इन्फेक्शनसह इतर काही आजारांचा धोका वाढला आहे. कोविड रुग्णांनी उपचार सुरू होण्यापूर्वी तसेच कोविडमधून बरे झाल्यावरही विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे. सर्वसामान्य व्यक्तींच्या तुलनेत जे लोक दुर्धर आजाराने ग्रस्त आहे, अशा रुग्णांमध्ये कोरोनाचे गंभीर लक्षणं दिसून येतात. या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी उपचारादरम्यान प्रभावी औषध म्हणून रेमडेसिविर तसेच उपचाराचा शेवटचा पर्याय म्हणून स्टेरॉईडचा वापर केला जातो. या उपचारातून अनेक रुग्णांनी कोविडवर मात केली आहे, मात्र काही रुग्णांवर त्याचा विपरीत परिणामही झाल्याचे दिसून येत आहे. हे दुष्परिणाम प्रामुख्याने मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये, तसेच ज्या रुग्णांमध्ये स्टेरॉईडच्या वापरादरम्यान शुगर वाढल्याची समस्या उद्भवली अशाच रुग्णांमध्ये जाणवले. फंगल इन्फेक्शनचा धोका याच माध्यमातून होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा कोविडच्या गंभीर रुग्णांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच डॉक्टरांना त्यांच्या विविध आजारांविषयी माहिती देणे गरजेचे आहे.
रेमडेसिविरचे साईड इफेक्ट
रेमडेसिविर हे कोविड रुग्णांसाठी संजीवनी ठरले, मात्र त्याचेही काही साईड इफेक्ट असल्याचे समोर आले आहे. रेमडेसिविर हे लिव्हर फंक्शन, किडनी आणि हृदयाचे कार्य प्रभावित करते. त्यामुळेच डॉक्टर रुग्णाला रेमडेसिविर देण्यापूर्वी रुग्णांच्या लिव्हर फंक्शनसोबतच किडनी क्रियेटिनीनचे निरीक्षण करतात. या निरीक्षणानंतरच डॉक्टर रुग्णांना रेमडेसिविर देतात. रेमडेसिविरमुळे अनेकदा रुग्णाच्या हृदयाचे ठोके कमी पडतात.
स्टिरॉईडचे साईड इफेक्ट
स्टेरॉईडच्या वापरामुळे ज्या व्यक्तीला शुगरची समस्या नाही, अशा रुग्णाचेही शुगर वाढू शकते. त्यामुळे मधुमेहदेखील होऊ शकतो. म्हणूनच डॉक्टर तीन ते चार वेळा रुग्णाच्या शुगरचे निरीक्षण करतात. या शिवाय, स्टेरॉईडचे किडनीवर तसेच रक्तदाब, शरीरावर सूज येणे आदी लक्षणे दिसू लागतात. तसेच काळी बुरशी म्हणजेच फंगल इन्फेक्शनची समस्यादेखील उद्भवू शकते. हा आजार डोळ्यांसह नाकाचे हाड आणि मेंदूपर्यंत पोहोचू शकतो.
कोविड होऊन गेलेल्या काही रुग्णांमध्ये त्याचे दुष्परिणाम आढळून आले. त्यामुळे रुग्णांनी कोरोनातून बरे झाल्यानंतरही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. बरे झालेल्या रुग्णांना डोळ्यात किंवा नाकात काही त्रास झाल्यास त्यांनी थेट तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधोपचार घ्यावा.
- डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, विभागप्रमुख, मेडिसीन, जीएमसी, अकोला