कोरोनानंतरचे साईड इफेक्ट्स वाढले, औषधं काळजीपूर्वक घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:17 AM2021-05-10T04:17:52+5:302021-05-10T04:17:52+5:30
रेमडेसिविरचे साईड इफेक्ट रेमडेसिविर हे कोविड रुग्णांसाठी संजीवनी ठरले, मात्र त्याचेही काही साईड इफेक्ट असल्याचे समोर आले आहे. रेमडेसिविर ...
रेमडेसिविरचे साईड इफेक्ट
रेमडेसिविर हे कोविड रुग्णांसाठी संजीवनी ठरले, मात्र त्याचेही काही साईड इफेक्ट असल्याचे समोर आले आहे. रेमडेसिविर हे लिव्हर फंक्शन, किडनी आणि हृदयाचे कार्य प्रभावित करते. त्यामुळेच डॉक्टर रुग्णाला रेमडेसिविर देण्यापूर्वी रुग्णांच्या लिव्हर फंक्शनसोबतच किडनी क्रियेटिनीनचे निरीक्षण करतात. या निरीक्षणानंतरच डॉक्टर रुग्णांना रेमडेसिविर देतात. रेमडेसिविरमुळे अनेकदा रुग्णाच्या हृदयाचे ठोके कमी पडतात.
स्टिरॉईडचे साईड इफेक्ट
स्टेरॉईडच्या वापरामुळे ज्या व्यक्तीला शुगरची समस्या नाही, अशा रुग्णाचेही शुगर वाढू शकते. त्यामुळे मधुमेहदेखील होऊ शकतो. म्हणूनच डॉक्टर तीन ते चार वेळा रुग्णाच्या शुगरचे निरीक्षण करतात. या शिवाय, स्टेरॉईडचे किडनीवर तसेच रक्तदाब, शरीरावर सूज येणे आदी लक्षणे दिसू लागतात. तसेच काळी बुरशी म्हणजेच फंगल इन्फेक्शनची समस्यादेखील उद्भवू शकते. हा आजार डोळ्यांसह नाकाचे हाड आणि मेंदूपर्यंत पोहोचू शकतो.
कोविड होऊन गेलेल्या काही रुग्णांमध्ये त्याचे दुष्परिणाम आढळून आले. त्यामुळे रुग्णांनी कोरोनातून बरे झाल्यानंतरही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. बरे झालेल्या रुग्णांना डोळ्यात किंवा नाकात काही त्रास झाल्यास त्यांनी थेट तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधोपचार घ्यावा.
- डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, विभागप्रमुख, मेडिसीन, जीएमसी, अकोला